शिरवळ (वृत्तसंस्था) काही दिवसांपूर्वी पुण्यातील (Pune) मटका व्यावसायिकाची (Mataka King Murder) खंडाळा तालुक्यातील शिरवळ याठिकाणी निर्घृण हत्या करण्यात आली होती. दरम्यान, या हत्येचा मास्टरमाइंड भारतीय जनता पक्षाचा एक पदाधिकारी असल्याची माहिती आता समोर आली आहे. शिरवळ पोलिसांनी संबंधित पदाधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहे.
अमोल बंडोपंत हुलावळे असं अटक केलेल्या ३६ वर्षीय आरोपीचं नाव आहे. आरोपी हुलावळे हा पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरातील रहिवासी आहे. आरोपी हुलावळे हा भाजपच्या माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षा रक्षक जनरल कामगार युनियनचा पश्चिम महाराष्ट्र प्रदेशचा कार्याध्यक्ष आहे. तसेच अखिल भारतीय मराठा युवक प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही तो कार्यरत आहे.
पुण्यातील बिबवेवाडी येथील रहिवासी असणाऱ्या मटका किंग संजय पाटोळे (वय ३६) यांच्या हत्येत बीजेपी पदाधिकारी अमोल हुलावळे याचा हात असल्याची माहिती शिरवळ पोलिसांना मिळाली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुणे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी हुलावळे याला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला २ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शिरवळ पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी केली जात आहे.
संशयित आरोपी ‘गोल्डन मॅन’ म्हणून परिचित
संशयित आरोपी अमोल हुलावळे हा भारती विद्यापीठ परिसरात ‘गोल्डन मॅन’ म्हणून सर्वांना परिचित आहे. त्याचा या परिसरात दबदबा आहे. आगामी महानगरपालिका निवडणूक लढवण्याची तयारी देखील त्याने सुरू केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास शिरवळ पोलीस करत आहेत.