बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील मुक्तळ येथील २९ वर्षीय ग्रामपंचायत सदस्य शिवाजी गोकुळ पारधी यांचा प्रेमसंबंधाच्या संशयावरून गळ्यावर धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला. याप्रकरणी बोदवड पोलिसांनी ९ जणांना अटक केली.
काही दिवसांपासून होते बेपत्ता
उच्च शिक्षित असलेले शिवाजी पारधी हे मुक्तळ येथील ग्रामपंचायत सदस्य आहेत. ते काही दिवसांपासून बेपत्ता होते. याबाबत ६ मार्चला रात्री त्यांचे भाऊ सुनील गोकुळ पारधी यांनी बोदवड पोलिसांत मिसिंगची नोंद केली होती. दरम्यान, रविवारी रात्री मलकापूर रोडवरील पुलाखाली एका तरुणाचा मृतदेह आढळला. यानंतर पोलिसांनी काही वेळातच ओळख पटवली. मृतदेह शिवाजी पारधी यांचा असल्याचे समोर येताच अवघ्या काही तासांत सोमवारी दुपारी २ वाजता संशयितांना अटक करण्यात आली.
अशी आहेत अटक केलेल्यांची नावं !
संशयितांमध्ये रविना उर्फ धनश्री सचिन कोल्हे (वय २१), सचिन श्रीधर कोल्हे (वय ३२), श्रीधर रामधन कोल्हे (वय ५९), अमोल श्रीधर कोल्हे (वय ३०), नितीन भास्कर कोल्हे (वय ३२), निर्मलाबाई श्रीधर कोल्हे (वय ५०, सर्व रा.मुक्तळ) व पुंडलिक यशवंत वारके (वय ४९) व पल्लवी पुंडलिक वारके (वय ३६, रा. शिंदी ता.भुसावळ) आदींचा समावेश आहे. घटनेशी निगडीत एका विवाहित तरुणीसोबत मृत शिवाजी पारधी यांचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून वरील आरोपींनी शिवाजीला मारहाण व गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. नंतर मृतदेह ५ मार्चच्या रात्री दीड वाजता मलकापूर रोडवरील पुलाखाली फेकून दिला होता, असा फिर्याद आरोप करण्यात आला आहे.
घटनास्थळावरून महत्वपूर्ण पुरावे ; ठसे तज्ञ व फॉरेन्सिक लॅब पथकाची मदत !
पोलिसांना घटनास्थळी रक्ताचे नमुने, रक्तमिश्रित माती व काचेच्या बाटलीचे तुकडे, पुलाच्या भिंतीलगत तुटलेली बिअरची बाटली जप्त केली. जळगाव येथील ठसे तज्ञ व फॉरेन्सिक लॅब पथकाचीही मदत घेण्यात आली. याप्रकरणी सुनील गोकुळ पारधी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. आरोपींना सोमवारी बोदवड न्यायालयात हजर केल्यावर ११ मार्चपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ करत आहेत. सोमवारी अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी घटनास्थळी भेट दिली. तर डीवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे हे रविवारी रात्रीपासून बोदवड येथे थांबून होते.