लातूर (वृत्तसंस्था) लातूरच्या साईधन लॉजमध्ये मालकाची आत्महत्या तर एकाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. उमेश रमेश देशमुख असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे तर साईधन लॉज मालक शिवाजी दगडू शिंदे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात एक खळबळजनक खुलासा केला आहे.
लॉज चालवत असलेल्या शिवाजी शिंदे यांनी आत्महत्या करण्याआधीच उमेश देशमुख याचा खून केला आणि नंतर तिसऱ्या मजल्यावर गळफास घेत आत्महत्या केली आहे. शिंदे यांची चुलत पुतणी ही उमेश देशमुख याची पत्नी आहे. ते काही दिवसांआधी लातूरला आले होते. प्राथमिक माहितीनुसार, देशमुख हा नेहमी आपल्या पत्नीला मारहाण करायचा. याबद्दल विचारलं असता दोघांमध्ये वाद झाला असावा. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे दोघांनी एकत्र रात्री दारू प्यायली आणि त्याच नशेत हा खून झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. यापुढे अधिक तपास सुरू असल्याची माहिती डीवायएसपी जगदाळे यांनी दिली.
हे लॉज लातूर शहरातील साईनाका इथे आहे. या प्रकरणी विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मयत दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले आहेत. तर पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.