गोंदिया (वृत्तसंस्था) पंचायत समिती गोंदियाच्या विस्तार अधिकाऱ्याला बुधवारी (८ नोव्हेंबर) गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ज्ञानेश्वर रघुनाथ लंजे (५७) असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
तक्रारकर्ते ग्रामसेवक असून, तीन महिन्यांपूर्वी निलंबित झाले आहेत. त्यांचे दोषारोप (फॉर्म नंबर ते १ ते ४) तयार करून गटविकास अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा परिषद कार्यालयाला पाठविण्याकरिता तक्रारदाराने विनंती केली. यावेळी विस्तार अधिकारी लंजे यांनी दोषारोप तयार करून गटविकास अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा परिषद कार्यालय गोंदिया येथे पाठविण्याकरिता १० हजार रुपये लाच मागितली. तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ज्ञानेश्वर लंजे याला लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक उमाकांत उगले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
















