अमळनेर (प्रतिनिधी) येथील प्रताप महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या केंद्रावरील बहिस्थ परीक्षक विजय गुलाबराव पाटील (50, रा. सिद्धिविनायक कॉलनी, घर नंबर 171, अमळनेर) यास पाच हजारांची लाच घेताना नाशिक येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. तक्रारदार यांच्या पत्नीचे व इतर आठ विद्यार्थ्यांचे बी. लिबचे पेपर सुरू होते. विजय पाटील यांनी कॉपीला सहकार्य करण्यासाठी एकूण ७,२०० रुपयांची मागणी विद्यार्थ्यांकडे केली होती.
अमळनेरातील 40 वर्षीय तक्रारदार यांच्या पत्नी प्रियंका या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत बिलीप (बॅचलर ऑफ लायब्ररी) ची अंतिम परीक्षा देत आहेत. या परीक्षेचे पेपर्स हे अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयात सुरू आहेत. तक्रारदार यांची पत्नी प्रियंका व त्यांच्या सोबतच्या एकूण आठ विद्यार्थ्यांना बहिस्थ परीक्षक विजय पाटील हे पेपर्स घेऊन विनाकारण त्रास देत होते. एवढेच नव्हे तर त्रास न देता सहकार्य करण्यासाठी तक्रारदाराच्या पत्नीकडे शंभर रुपयांप्रमाणे नऊ विषयांचे नऊशे तसेच एकूण आठ विद्यार्थ्यांचे सात हजार दोनशे रुपये लाच मागण्यात आली.
परंतू लाच देण्याची इच्छा नसल्याने अमळनेरच्या तक्रारदाराने नाशिक एसीबीकडे शुक्रवारी तक्रार नोंदवताच सापळा रचण्यात आला. दुपारी 12 वाजता तक्रारदाराकडून लाच स्वीकारताच आरोपी विजय पाटील यास अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सापळा पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मनेतृत्वात राजेंद्र गीते, संदीप बत्तीसे, संजय ठाकरे, संतोष गांगुर्डे आदींच्या पथकाने यशस्वी केला.