धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील एका शिक्षण संस्था शाळेचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी पालकांना नाहक त्रास देत असून, दोन-तीन टप्प्यात फी भरण्याची विनंती करणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जात असल्याच्या गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या असून याबाबत लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेत भाजपचे शिष्टमंडळ तक्रार आहे. तसेच शैक्षणिक फी साठी विदयार्थ्यांची पिळवणूक झाल्यास आंदोलन उभं केले जाईल, असा ईशारा भाजप युवानेते चंदन पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
चंदन पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, शहरातील एक खासगी शिक्षण संस्था शैक्षणिक शुल्कासाठी काही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करत आहे. परीक्षा फी, प्रवेश फी, नोंदणी फी, ग्रंथालय फी, संगणक फी, ऑनलाइन फी, शा विविध कारणांखाली बेकायदेशीर फी वसुली करून विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याची तक्रार अनेक पालकांनी भाजपकडे केल्या आहेत. यामुळे पालक वर्गात फार मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झालेला आहे. विद्यार्थ्यांकडून दहा-वीस हजाराची फी घेतली जातेय मात्र, कोणतीही पावती दिली जात नाहीय.
आधीच पावसाअभावी शेतकरी वर्ग हा फार मोठ्या प्रमाणात संकटात आहे. आणि तशात विद्यार्थ्यांच्या ऍडमिशनच्या नावावर फार मोठ्या प्रमाणात ऍडमिशन फीच्या नावावर एका संस्थेत लूट चालू आहे. या संदर्भात लवकरच पालक वर्ग तक्रार देण्याच्या मनस्थितीत आहे. त्यामुळे सर्व पिडीत विद्यार्थी व पालकांशी चर्चा करून कायदेशीर कारवाईसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेत भाजपचे शिष्टमंडळ तक्रार करणार असल्याचेही चंदन पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.