जळगाव (प्रतिनिधी) जलयुक्त शिवारबाबत अनेक तक्रारी सरकारकडे आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतरांनी सांगितल्यानंतर देवेंद्रजींनीच सांगितले होते की, त्यात गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार असेल, तर चौकशी करा. देवेंद्र फडणवीसांनी स्वतःहून सरकारला याबाबत आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सरकारने या ठिकाणी चौकशी करायचे ठरवलेले आहे. त्यात गैरव्यवहार असल्यास, कोणी दोषी असल्यास तथ्य बाहेर येईलच, असे भाजपा नेते एकनाथराव खडसे म्हणाले आहेत.
फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेली जलयुक्त शिवार वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कॅगने ताशेरे ओढल्यानंतर ठाकरे सरकारने जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्या निर्णयावरच एकनाथराव खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, जलयुक्त शिवार योजनमध्ये ६ लाख ३३ हजार कामे झाली, त्यावर ९ हजार ७०० कोटी रुपयांचा खर्च झाला. त्यात शास्त्रशुद्ध पद्धतीने कामे केली नाहीत. ७०० तक्रारी आल्या आहेत. त्यात गंभीर भ्रष्टाचार झाला असल्याची शक्यता आहे. त्याची चौकशी केली जाणार आहे. चौकशी कशी करायची हे दोन दिवसांत ठरवले जाणार आहे. फोटो आणि पुराव्यानिशी या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मृदा आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली होती. दुसरीकडे पाण्याची पातळी किती वाढली याची ओपन चौकशी होईल. मागच्या काळात जी कामे झाली त्यांचीही चौकशी होणार आहे. मागे दीड हजार टँकर लागायचे, आता पाच हजार लागत आहेत, इतके टँकर का वाढले?, असा सवालही पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला आहे. कॅगचा आधारावर ही चौकशी केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.