जळगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावरून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी केलेली टीका चुकीची आहे. त्यांनी अगोदर उद्धव ठाकरे यांनी केलेली घोषणा तपासावी, असे ना. गुलाबराव पाटील म्हणाले.
नुकत्याच झालेल्या वादळामुळे कोकण किनारपट्टीचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच केली. त्यांनी मदतीची घोषणा केली नाही, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. त्यावर बोलताना पाणी पुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले, नैसर्गिक आपत्ती, कोविड काळात राजकारण व टीका टिप्पणी न होता सूचना झाल्या पाहिजेत. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याअगोदर त्यांनी घोषणेची माहिती घ्यावयास हवी होती.
उद्धव ठाकरे त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी राज्याकडून जी घोषणा केली ती तपासली तर ते काय करून आले, हे देवेंद्र फडणवीस यांच्या लगेच लक्षात येईल. जळगाव महापालिकेने लसीचे डोस खरेदी करण्याबाबतच्या निर्णयावर बोलताना ते म्हणाले, महापालिकेचे प्रयत्न ठीक आहेत. पण डोस किती मिळतील हे सांगता येणार नाही.
















