यावल (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवार, 13 मे रोजी रावेर लोकसभा निवडणुकीकरीता मोठ्या उत्साहात व शांततेत मतदान पार पडले. यावल शहरात व वड्री येथे प्रत्येकी एका मतदान केंद्रावर सकाळच्या सत्रात ईव्हीएम यंत्रात बिघाड झाला व तासाभरानंतर येथे समस्या सोडवत मतदानाला सुरवात झाली. मतदान केंद्रात बालकांना घेवून आलेल्या स्तनदा मातांना थांबण्यासाठी तर बालकांचा सांभाळ करण्याकरीता पाळणाघरांची व्यवस्था करण्यात आली होती. यावल शहरात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारे उभारलेले मतदान केंद्र हे लक्षवेधी ठरले होते.
दोन ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड
रावेर लोकसभा मतदार संघात चौथ्या टप्प्यात सोमवारी मतदान पार पडले सकाळपासून यावल शहर सह तालुक्यात मतदारांनी मतदान केंद्रावर मतदानाकरीता गर्दी केली. मतदारांमध्ये उत्साह दिसून आला तर यावल शहरातील गुरूमाई शाळेतील मतदान केंद्रात तसेच वड्री या गावातील मतदान केंद्रात अशा दोन ईव्हीएम यंत्रात बिघाड झाला. तासभर येथे मतदार रांगेतच थांबून होते. समस्या सुटल्यावर येथे सुरळीतपणे मतदान पार पडले तर यावल तालुका हे आदिवासी बहुल क्षेत्र असल्याने शहरातील शशिकांत सखाराम कन्या शाळेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, फैजपूर प्रांताधिकारी देवयानी यादव, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, प्रकल्प अधिकारी अरुणण पवार, निवासी नायब तहसलदार संतोष विनंते, निवडणूक नायब तहसीलदार रशीद तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी विकास विभागामार्फत आदर्श आदिवासी संस्कृती देखावा साकारण्यात आला. आदर्श आदिवासी संस्कृतीचा अभिमान सोबत मतदान जागृती करण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास विभाग यावल मार्फत मतदारांना आकर्षित करण्यासाठी आदिवासी कुटी, पारंपरिक साहित्ये, आदिवासी पारंपरिक तडवी भिल्लोरी बोलीभाषेतील घोषवाक्य व संस्कृतीचा देखावा साकारण्यात आला होता. सदरील देखावा मतदारांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता.
यांनी उभारला आदिवासी देखावा
आदर्श आदिवासी संस्कृतीचे दर्शन देखाव्यासाठी सहायक प्रकल्प अधिकारी जावेद तडवी, कार्यालयीन कर्मचारी तसेच मुराद तडवी, मजीत तडवी, मुस्तफा तडवी, अय्युब तडवी व फिरोज तडवी पेंटर यांनी परिश्रम घेतले. वारली पेटींग येथे लक्षवेधी ठरली..