नवी दिल्ली (वृत्तसंस्था) यूजीसीने देशातील २४ युनिव्हर्सिटी बनावट घोषित केल्या आहेत. यामधील दोन युनिव्हर्सिटीनी नियमांचे उल्लंघन केलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेत याबाबत माहिती दिली आहे. विद्यार्थी, पालक, सामान्य जनता आणि इलेक्ट्रॉनिक, प्रिंट मीडियाकडून आलेल्या तक्रांरींच्या आधारे यूजीसीने २४ स्वयं-घोषित युनिव्हर्सिटींना बनावट घोषित केलं आहे.
“विद्यार्थी, पालक, नागरिक तसंच प्रसारमाध्यमांकडून मिळालेल्या तक्रारींच्या आधारे युजीसीने २४ विद्यापीठांना बोगस घोषित केलं आहे,” अशी माहिती त्यांनी दिली. “याशिवाय लखनऊमधील भारतीय शिक्षा परिषद आणि नवी दिल्लीमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅनिंग अॅण्ड मॅनेजमेंटकडून युजीसीच्या नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचं समोर आलं आहे. या दोन्ही संस्थांचं प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली,
सर्वाधिक बोगस विद्यापीठं असणाऱ्यांमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशात आठ बोगस विद्यापीठं असून दिल्लीमध्ये सात आहेत. ओडिशा आणि बंगालमध्ये प्रत्येकी दोन बोगस विद्यापीठं असून कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, पाँडिचेरीत प्रत्येकी एक विद्यापीठ आहे. महाराष्ट्रातील हे विद्यापीठ नागपुरात असून राजा अरेबिक युनिव्हर्सिटी असं नाव आहे.
या विद्यापीठांवरील कारवाईसंबंधी बोलताना त्यांनी सांगितलं की, “युजीसीने या विद्यापीठांसंबंधी हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये सार्वजनिक नोटीस प्रसिद्ध केली आहे”. तसंच आयोगाने राज्याचे सचिव, शिक्षण सचिव आणि मुख्य सचिवांना पत्र लिहून त्यांच्या अख्त्यारित असणाऱ्या अशा विद्यापीठांवर कारवाई करण्यास सांगितलं असल्याचं ते म्हणाले आहेत. यासोबत अवैध डिग्री देणाऱ्या या संस्थांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.