जळगाव (प्रतिनिधी) शहरातील अर्थव लॅबच्या एका चुकीच्या रिपोर्टमुळे हृदयरोग असलेल्या एका वृद्ध रुग्णाचा जीव धोक्यात पडल्याचा खळबळजनक प्रकार नुकताच समोर आला आहे. याप्रकरणी नातेवाईकांनी डीनसह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी अर्ज केला आहे. तर दुसरीकडे धरणगाव तहसीलदारांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना संबधित लॅबवर कारवाईचे आदेश दिले आहेत.
धरणगाव येथील प्रतिक जैन यांनी जिल्हाधिकारी आणि डीन यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझे वडील विरचंद गुलाबदास जैन (वय, ६९) हे हदयरोगाचे पेशंट आहेत. दि. २९ सप्टेंबर रोजी रोजी ते घरी चक्कर येऊन पडले. मी तात्काळ जवळच असलेल्या आमच्या फॅमिली डॉक्टरांना बोलावले. त्यांनी पेशंटची परिस्थिती बघता cbc, S. Creat, S. Ureacid, CRP, D-Dimer या तपासण्या करण्यास सांगितले. मी लगेच घरासमोरील श्रीराम लॅबोरेटरी (डी.एस.देवरे) यांना बोलावले. त्यांनी चाचणीसाठी लागणारे रक्ताचे नमुने घेतले व २४५० रूपये अगोदर द्यावे लागतील असे सांगितले. त्याप्रमाणे मी बिल नं. ६४०२ घेऊन त्यांना २४५० रुपये रोख दिले. त्यानंतर रिपोर्टमध्ये सीआरपी व्हॅल्यू १०४ प्रति लिटर (CRP Value-104 mal) आली. त्याप्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्याने व परिस्थीती बघत्ता दुसऱ्या दिवशी धरणगाव शहरातील शासकीय कलेक्शन सेंटरमध्ये वडिलांची रॅपीड अॅटींजन टेस्ट केली. ती टेस्ट निगेटीव्ह आली. परंतू पूर्ण खात्री करण्यासाठी मी वडिलांची आरटीपीसीआर (RTPCR) ही टेस्ट केली. त्याच दिवशी सायंकाळी आम्हाला श्रीराम लॅबचे श्री.देवरे यांनी जळगाव येथे पाठविलेला अर्थव पॅथॉलॉजी (डॉ.धिरज माहेशरी) यांचा डी-डायमरचा (D-Dimer) कोरोना सलग्न रिपोर्ट प्राप्त झाला असून तो २६८६ नॅनोग्राम परमिली लिटर (Ng/ml) असल्याचे सांगितले. या रिपोर्टप्रमाणे जळगावातील तज्ञ डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आम्ही तत्काळ एचआरसीटी स्कॅन (HRCT Scan) करावे लागेल, असे सांगितले. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा डॉक्टरांना भेटलो आणि एचआरसीटी स्कॅन केले.
दुसरीकडे डी-डायमर २६८६ नॅनोग्राम परमिली लिटर असल्यामुळे तसेच आरटीपीसीआर रिपोर्टही प्रलंबित असल्यामुळे परिस्थिती बघता डॉक्टरांनी करोनोसदृश प्रतिबंधक औषधी सुरु केल्या. परंतू पेशंटला काहीच त्रास नसल्यामुळे कोरोना आजारा संबंधी अधिक स्पष्टता यावी, म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने कृष्णा डायग्नोस्टीक लॅबमधून केले असता डी-डायमर अवघा ३६० परमिली लिटर (Ng/ml) असा नॉर्मल रिपोर्ट आला. यानिमित्ताने दोन्ही लॅबमधील रिपोर्टमध्ये खुप मोठी तफावत आढळली. नंतर आरटीपीसीआर (RTPCR) रिपोर्ट देखिल निगेटिव्ह आला.
कोरोनाची काही लक्षणे नसतांना फक्त एका चुकीच्या रिर्पोटमुळे एचआरसीटी स्कॅन व इतर रिर्पोट गरज नसतांना कोरोनाच्या चाचण्या व औषधी घ्याव्या लागल्या. यामुळे माझ्या वडिलांचे काही कमी जास्त झाल्यास जबाबदार कोण?. याबाबत श्रीराम लॅब व अर्थव लॅबच्या संचालकांना जाब विचारले असता, आमचा काहीही संबंध नाही, असे म्हणत उड़वा उडवीचे उत्तर दिले. अर्थव लॅबमधील डॉक्टर तर म्हणाले की, आपणास जे करावयाचे आहे ते करा. आमचे वरपर्यंत संबंध आहेत. एका चुकीच्या रिपोर्टमुळे माझ्या वडिलांचे काही बरे वाईट झाल्यास सर्वस्वी जबाबदार श्रीराम लॅबचे डी.एस.देवरे व अर्थव पॅथॉलॉजी लॅबचे डॉ.धिरज माहेश्वरी हे असतील. तसेच दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी प्रतिक जैन यांनी केली आहे.
धरणगाव तहसीलदारांकडून कारवाईच्या सूचना
श्रीराम लॅबचे डी.एस.देवरे व अर्थव पॅथॉलॉजी लॅबचे डॉ.धिरज माहेश्वरी यांच्याबाबत प्रतिक जैन यांनी तक्रारी अर्ज दिला होता. त्यावर ७ ऑक्टोंबर रोजी धरणगाव तालुका वैद्यकीय अधिकारींना कारवाईच्या सूचना केल्या असून केलेल्या कारवाईची अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.