जळगाव (प्रतिनिधी) आशादीप वसतीगृहातील प्रकरणात दोन वेगवेगळ्या प्रकरणातून खोटेपणाची गुंतागुंत वाढली आहे. पहिले प्रकरण पारोळ्यातील एका तरुणीला आई, बाप व भावासह शेजाऱ्यांनी अस्वस्थ मनोवृत्तीची ठरवून कोर्टामार्फत आशादीपमध्ये पाठवले आहे. याचे पोलीसांना दिलेले निवेदन पुरावा आहे. असे ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनी सोशल मीडियात स्पष्ट केले आहे.
दुसरे प्रकरण समतानगरमधील प्रेम प्रकरणातून उद्भवलेले असून त्यातील तरुणीला आशादीपमध्ये ठेवले होते. या तरुणीला रितसर आई वडीलांकडे पाठवावे म्हणून मणियार बिरादरी कागदोपत्री प्रयत्न करीत आहे. या प्रकरणातील ती तरुणी चार दिवस पारोळ्याच्या तरुणी सोबत होती. दि. २८ फेब्रुवारी ते दि. ३ मार्च दरम्यान ती तेव्हा तेथे होती. त्यामुळे समतानगरवाली तरुणी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. दोन दिवसांपूर्वी समतानगरच्या तरुणीला घरी पाठवले जाणार होते. यासाठी मणियार बिरादरीचे पदाधिकारी आशादीपमध्ये होते. तेव्हा समतानगरवाल्या तरुणीची माहिती काढायला २/३ तरुण वसतीगृह बाहेर होते. पारोळा येथील तरुणीला भेटायला एक जण आलेला होता. आशादीप व्यवस्थापनाने दोन्ही तरुणींना भेट नाकारली. समतानगरवाल्या मुलीसाठी रितसर परवानगीने मणियार बिरादरीचे पदाधिकारी आत होते.
भेटायला परवानगी नाही हे पाहून पारोळ्याची तरुणी आरडाओरड करायला लागली. समतानगरवालीला भेटायला आलेल्या एकाने तिच्या ओरडण्याचा व्हिडिओ केला. त्यानेच इतरांना कॉल करून सांगितले, ‘होस्टेल में रेप हो रहा है.’ अती उत्साहात त्याने आरडाओरडचा व्हिडिओ इतरांना पाठवला. नंतर इतरही समाजसेवी तेथे पोहचले. आतमध्ये वसतीगृह अधीक्षकासमोर काही जण गेले. तो व्हिडिओ काढणाराही आला. त्याला पाहून अधीक्षक म्हणाल्या, ‘हाच तो. मोबाईलद्वारे व्हिडिओ काढत होता’ तेव्हा मणियार बिरादरी पदाधिकारी यांनी त्याला जवळ बोलावून तो आरडाओरडचा मोबाईलमधील व्हिडिओ डिलीट केला. पण तोवर माध्यमांना आशादीपमध्ये महिलांच्या नग्न नृत्याची बातमी पोहचली. दरम्यान स्वयंसेवी संस्था पदाधिकारी व ती ओरडणारी तरुणी यांचे बोलणेही झाले नाही.
वसतीगृहाच्या शेजारी असलेल्यांनी नंतर ‘वड्याचे तेल वांग्यावर’ काढले. कोणत्या खोट्या प्रकरणाला जोडून प्रतिक्रिया देत आहोत हा विचार केला नाही. आशादीपमध्ये मुलींचे आपापसात वाद होतात. त्याचा आरडाओरड होतो. त्याचा त्रासही शेजाऱ्यांना होत असेलच. पण त्या त्रासावर प्रतिक्रिया देताना जळगावच्या खोट्या बदनामीच्या प्रकरणाला खतपाणी घातले गेले. गंमत बघा ज्या मुलीला नातेवाईकांना मानसिक अस्वस्थ ठरवले आहे. तसे लेखीपत्र पोलिसांकडे आहे, तीने मारलेल्या आरोळ्या नग्न नृत्याचा पुरावा झाल्या. पण आत असलेल्या इतर १७ तरुणी- महिलांच्या चारित्र्यावर डाग लागले. जे घडलेले नाही ते घडले समजून आता आंबट शौकिन नृत्याची क्लिप शोधत आहेत. वसतीगृहातील व्यवस्थापनाविषयी तक्रारी असू शकतात पण नग्न होऊन नृत्य करायला लावले ? कोणासमोर ? गाणे कोणते ? कशावर वाजवले ? असे प्रश्नही शंका घेऊन आले नसावेत ?
गंमत पुढे आहे. समतानगरमधील मुलीच्या घरी परतीचे कागदावर काही जणांच्या सह्या आहेत. त्यात वादग्रस्त व्हिडिओ शूट करणारा तो तरुणही आहे. मी त्याला विचारले, ‘आरोळ्या मारणाऱ्या त्या मुलीशी तू बोलला का ?’ तर तो म्हणतो, ‘मला मधे जाऊ दिले नाही. मी तिच्याशी बोललो नाही.’ वास्तविक समतानगरवाल्या तरुणीच्या कागदावर याने आत जाऊन सही केली आहे.
समतानगरवाली ती तरुणी म्हणते, ‘मी चार दिवस आत होते. तेथे कोणीही बाहेरून येत नाही. उलट ती ओरडणारी तरुणी इतरांना मारहाण करते. ती मानसिक अस्वस्थ आहे.’ यापेक्षा अजून प्रत्यक्षदर्शी कोण असू शकते ? ती आरोळ्या मारणारी पारोळ्याची तरुणी गरोदर तरुणींना मारहाण करीत असल्याचाही विषय समोर आला आहे. आशादीपमध्ये जळगाव तहसीलदारांनी तात्काळ भेट देऊन चौकशी केली आहे. तेव्हा पारोळ्याच्या त्या तरुणीने थेट सांगितलें, ‘आता कशी पळापळ करत आहेत. मी तक्रार करायाचे तर ऐकत नव्हते. मला करावी लागली अशी आरडाओरड.’
अशा प्रकारे आशादीपमधील न घडलेल्या घटनेचे कथानक जन्माला आले असून दोन वेगवेगळ्या प्रकरणातून एक खोटारडा व घाणेरडा प्रकार माध्यमांनी जळगावकरांच्या माथी मारला आहे.
या संपूर्ण प्रकरणाच्या मागे श्रेयवाद आणि हेव्यादाव्याची तीन प्रकरणे आहेत. पहिले प्रकरण म्हणजे समतानगरवाल्या तरुणीचे श्रेय मणियार बिरादरीला जावू नये म्हणून इतर काही तरुण आशादीप बाहेर घोटाळत होते. दुसरे प्रकरण म्हणजे महिला संघटनांमधील नेत्या महिलांचे यापूर्वी आपापसात मतभेदाचे विषय आहेत. त्यातून ‘ती आली का मग मी आता विरोधात’ असाही प्रकार आहे. तिसरे प्रकरण हे वसतीगृहातील सदस्य नेमणुकीतून घडले आहे. कोणाला तरी काढले आणि कोणाला तरी घेतले. याचे किल्मिष कोणाच्या तरी डोक्यात आहे. असे दिलीप तिवारी यांनी सांगितले.
अगदीच खुज्या, कुचकट मनोवृत्तीतून आशादीपची बदनामी करणारे प्रकरण घडले आणि माध्यमांनी सत्य न जाणून घेता केवळ आणि केवळ एका तरुणीच्या ओरडण्यावर बातम्या केल्या. उरलेल्या त्या १७ तरुणींच्या बदनामीचा दोष कोण शिरावर घेणार???. तसेच या विषयावर कोणीही पुरावे सादर करावेत असे आव्हान दिलीप तिवारी यांनी केली आहे.