मुंबई (वृत्तसंस्था) ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम टीव्ही अभिनेता करण मेहरा याला सोमवारी रात्री गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. पत्नीसोबत भांडण करुन तिला मारहाण केल्याप्रकरणी अटक केली आहे. करण मेहरा हा हिंदी टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध चेहरा आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेमुळे तो विशेष गाजला.
गेल्या काही दिवसांपासून ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता करण मेहरा आणि निशा रावल यांच्या नात्यात वाद निर्माण झाला होता. पण सोमवारी दोघांमध्ये वाद पुन्हा एकदा विकोपाला गेला. त्यामुळे करण आणि निशामध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. या भांडणाचा राग डोक्यात धरून करणने निशाला मारहाण केल्याची माहिती समोर आली.
निशा रावलने करणच्या विरोधात गोरेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर करणला सोमवारी रात्रीच अटक करण्यात आली. करणला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.