मुंबई (वृत्तसंस्था) टाटा समुहाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा पालघरजवळ अपघातात मृत्यू आहे. मिस्त्री अहमदाबादहून मुंबईकडे परतत असताना हा अपघात झाला. त्यांच्यासोबत इतर चार जण प्रवास करत होते. त्यातील एकाचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे.
सायरस मिस्त्री हे मर्सिडिजने प्रवास करीत होते. पालघरजवळ सूर्या नदीवर असलेल्या चारटोली ब्रिडवर त्यांच्या मर्सिडिज कारने डिव्हायडरला धडक दिल्याने हा अपघात घडला. यात घटनास्थळीच सायरस मिस्त्री आणि आणखी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात जखमी झालेल्या इतर दोघांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती आहे. या अपघातामध्ये मिस्त्री यांच्या गाडीचा चालक गंभीर जखमी झाला आहे. तर सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. चालकाचे गाडीवर नियंत्रण न राहिल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात घडला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच सायरस मिस्त्री यांचे निधन झाले होते. त्यांचे पार्थिव आता टाटा रुग्णालयातून गुजरातमधील त्यांच्या घरी नेले जाणार आहे. सायरस मिस्त्री यांचा जन्म 4 जुलै 1968 रोजी झाला. शापूरजी पालोनजी ग्रुपचे प्रमुख पालोनजी मिस्त्री यांचे ते धाकटे पुत्र होते. सायरस यांनी सुरुवातीचे शालेय शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन शाळेतून केले. त्यानंतर सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले. लंडन बिझनेस स्कूलमधून त्यांनी मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवीही घेतली होती.