सोलापूर (वृत्तसंस्था) भारत बंद हा शेतकऱ्यांचा, सामान्य जनतेचा भारत बंद आहे. मूठभर उद्योगपतींच्या फायद्यासाठी भाजपा सरकार शेतकरीविरोधी, कामगारविरोधी काळे कायदे लादत आहे. भाजपाच्या पाठीशी आता भगवान रामही उभे राहणार नाहीत”, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला महाराष्ट्रातूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देण्यात आला आहे. राजकीय पक्षांसह सर्व व्यापारी आणि उद्योजकांनी कडकडीत बंद पाळत शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे. “७/१२ वाचवायचा असेल तर ८/१२ च्या भारतबंदमध्ये सहभागी व्हा!”, असं ट्विट करत जनतेला बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहनही थोरात यांनी केलं आहे. याशिवाय, शेतकरी आंदोलन व भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील रिगल सिनेमाजवळील माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहितीही त्यांनी ट्विटरद्वारे दिली. ‘वावर हाय तर पावर हाय’ अशाही घोषणा आंदोलक देत असल्याचं समोर आलं आहे. इतकंच नाही तर सोशल मीडियावर अशी घोषवाक्य शेअर करून बंदमध्ये सामील होण्यासाठी नागरिकांना आवाहन केलं जात आहे.