
चाळीसगाव (प्रतिनिधी) : यावर्षी निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आज तालुक्यातील हिरापूर, हातगाव, अंधारी व शेवरी परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची व नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. गेल्या २५ वर्षांत पडला नाही असा तब्बल ५० दिवसांचा पावसाचा खंड यावर्षी पडल्याने पिकांची अवस्था अत्यंत गंभीर झाली असून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली असून मंत्रिमंडळातील सदस्य तसेच आमदार-खासदारांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करावी व शेतकऱ्यांना धीर द्यावा, असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मुख्यमंत्री फडणवीस हे स्वतः लातूर व धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, त्याच अनुषंगाने आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली.
यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना आमदार चव्हाण यांनी सांगितले की, पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी पिकांसाठी केलेला उत्पादन खर्चही वसूल होण्याची शक्यता कमी असून, उभे पीक काढण्यासाठीही पदरमोड करण्याची वेळ अनेक शेतकऱ्यांवर आली आहे.
“तालुक्यातील शेतकऱ्यांवर जेव्हा जेव्हा संकट आले, मग ते अवकाळी पाऊस असो किंवा दुष्काळाची परिस्थिती असो, त्या प्रत्येक वेळी शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यावेळीही शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. परिस्थिती गंभीर असली तरी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,” असे आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या दोन दिवसांत दुष्काळासंदर्भातील पहिला शासन निर्णय काढण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगत, त्यामध्ये चाळीसगाव तालुक्याचा समावेश व्हावा यासाठी आवश्यक तो प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठविण्याच्या सूचना आमदार चव्हाण यांनी प्रशासनाला दिल्या. तसेच याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशीही चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी धीर धरावा आणि खचून जाऊ नये. शासनाच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही आमदार चव्हाण यांनी यावेळी दिली.
या पाहणीप्रसंगी प्रांताधिकारी प्रमोद हिले, तालुका कृषी अधिकारी अभिषेक लगड यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच परिसरातील गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी लोकप्रतिनिधी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.














