साळवा ता. धरणगाव (दीपक भोई) कोणतीही पूर्वकल्पना न देता महावितरणने विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे साळवा परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान, संतप्त शेतकऱ्यांनी आज सकाळी साळवा फाट्यावरील महावितरणच्या कार्यालयात जात याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला.
या संदर्भात अधिक असे की, वीज बिल वसुलीसाठी वीज वितरण कंपनीनं शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली आहे. महावितरण कंपनीकडून पुन्हा एकदा शेतीपंपांचा वीज पुरवठा खंडीत करण्याचे प्रकार घडत आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे कृषी कनेक्शन तोडले जात आहे तर काही ठिकाणी डीपीच बंद केला जात आहे. धरणगाव तालुक्यातील साळवा परिसरातील मुख्य लाईन बंद करण्यात आलं आहे. यामुळे ऐन भिजवणीच्या काळात साळवा, साकरे, निशाणे, रोटवद, गोंदेगाव या गावातील जवळपास हजारहून अधिक कृषी पंप बंद पडले आहेत.
रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्या सुरु आहेत. मात्र महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना विजेचे देयके न देताच, थेट रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बंद करून कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा धडाका सुरु केला आहे. आम्हाला पूर्व कल्पना दिली असती तर आम्ही थोडं फार बिल भरण्यास तयार होतो, अशी भावना काही शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. तर दुसरीकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, होऊ शकला नाही.