मुंबई (वृत्तसंस्था) टोलनाक्यांतून जाणाऱ्या वाहनांचा प्रवास कॅशलेस व झटपट होण्यासाठी आजपासून (दि. १५) वाहनचालकांना ‘फास्टॅग’ (Fastag) बंधनकारक करण्यात आले आहे. आज रात्री १२ वाजल्यापासून ही ‘फास्टॅग’ अनिवार्य झालेली आहे. वाहनांवर फास्टॅग नसूनही फास्टॅगच्या मार्गिकेतून गेल्यास वाहनचालकांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे.
याआधी १ जानेवारीपासून ‘फास्टॅग’ लागू करण्यात येणार होते मात्र सरकारने याची मुदत वाढवून १५ फेब्रुवारी केली होती. त्यामुळे आता इथून पुढे देशभरात टोल भरण्यासाठी इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टम ‘फास्टॅग’ आवश्यक असेल. नॅशनल हायवेवरील कोणताही टोलनाका क्रॉस करण्यासाठी तुम्हाला ‘फास्टॅग’ जरुरी आहे. कॅश ट्रान्झेक्शनच्या तुलनेत फास्ट टॅगमुळे टोल प्लाझामध्ये लागणारा वेळ यामुळे आता वाचणार आहे. सध्याचा टोल पेमेंटमध्ये फास्टॅगचा हिस्सा सुमारे ७५ ते ८० टक्के आहे जो सरकारला १०० टक्के करायचा आहे. यामुळे सरकार १५ फेब्रुवारीनंतर याची मुदत वाढवणार नाहीत.
‘फास्टॅग’ म्हणजे काय?
वाहनाच्या विंडो स्क्रीनला लावलेल्या स्टिकरला फास्टॅग म्हणतात. याचे डिव्हाईस रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजीद्वारा वापर करते. ते थेट टोल नाक्यावरील स्कॅनरला कनेक्ट असंत. त्यामुळे तुमच्या अकाऊंटमधील पैसे कापले जातात. अशा वेळी तुमच्या गाडीला फास्टॅग लावलेला असेल तर कोणत्याही विलंबाशिवाय तुम्ही टोलनाक्यावरून निघून जाऊ शकता. हे फास्टॅग तुम्ही तुमच्या वॉलेट, डेबिट किंवा क्रेडिट कार्डशी जोडू शकता. त्यामुळे जिथे टोल भरण्याची गरज आहे, त्या टोल नाक्यावर तुमच्या अकाऊंटमधून आपोआप पैसे कट होतात.
फास्टॅग कोणासाठी आणि कुठून मिळेल?
एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय यासह २५ नामांकित बँकेच्या शाखांमधून किंवा ऑनलाइन फास्टॅग विकत घेता येतो. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत येणाऱ्या सर्व टोलनाक्यांवर, पेटीएम, अॅमेझॉन आणि माय फास्टॅग अॅपवरही सुविधा उपलब्ध आहे. तसेच, फास्टॅग बँकेत उपलब्ध असून तो २०० रुपयांना मिळतो. हा टॅग कमीत कमी १०० रुपयांपासूनही रिचार्ज करून मिळेल. ‘फास्टॅग’ खात्यातील टोलचे पैसे वजा झाल्यानंतर संबंधित वाहनचालकाला त्यासंबंधीचा एक ‘एसएमएस’ त्यांच्या मोबाइलवर येईल. खात्यातील पैसे संपल्यानंतर ते पुन्हा रिचार्ज करावे लागणार आहे. ‘फास्टॅग’ची मुदत पाच वर्षांची असेल. त्यानंतर नव्याने टॅग खरेदी करावे लागणार आहे. कार, जीप, व्हॅन आणि यांसारख्या वाहनांना ‘फोर’ क्लासचे ‘फास्टॅग’ बसवले जाणार आहेत. तर हलक्या मालवाहू आणि व्यावसायिक वाहनांना ‘फाइव्ह’ क्लासचे, थ्री अॅक्सेल व्यावसायिक वाहनांना ‘सिक्स’ क्लासचे आणि बस आणि ट्रकना ‘सेव्हन’ क्लासचे ‘फास्टॅग’ बसवण्यात येणार आहेत.
टोल प्लाझावरुन जात असताना गाडीला फास्ट टॅग नसल्यास वाहनांना टोलवर थांबावं लागत होतं. यामध्ये टोल प्लाझावर ट्रॅफिम जॅम होण्याची अधिक शक्यता असे. मात्र आता तसं होणार नाही.