जळगाव (प्रतिनिधी) प्रवासी रीक्षाने समोरून दुचाकीला उडवल्याने दुचाकीस्वार चालकासह 15 वर्षीय अल्पवयीन तरुणी आणि 45 वर्षीय महिला ठार झाली. हा अपघात जळगाव तालुक्यातील कानळदा गावाजवळील समर्थ शाळेनजीक सोमवारी सकाळी 11.45 वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात मयत झालेल्या महेश गोकूळ जोशी (पिंप्री, ता.धरणगाव) यांची ओळख पटली असून अल्पवयीन मुलीसह महिलेची रात्री उशिरापर्यंत ओळख पटलेली नव्हती.
जळगाव ते कानळदा रोडवरील समर्थ शाळेजवळ सोमवार, 26 जून रोजी सकाळी साडेदहा वाजता महेश गोकूळ जोशी (पिंप्री, ता.धरणगाव) हे दुचाकी क्रमांक (एम.एच.19 बी.वाय. 9903) ने ट्रिपल सीट कानळदा रोडवरून जळगाव शहराकडे येत असताना कानळदा गावाजवळील समर्थ शाळेसमोर जळगावकडून काळदाकडे रीक्षा क्रमांक (एम.एच.19 व्ही.8070) ने समोरून दुचाकीस्वाराला धडक दिल्याने तिघे रस्त्यावर पडले व अपघातानंतर रीक्षाही उलटली. या अपघातात रीक्षातील प्रवासी विमलबाई चौधरी, मंगलाबाई चौधरी, सुनीता चौधरी, राधाबाई चौधरी आणि रीक्षा चालक रवींद्र भावलाल पाटील (सर्व रा.आव्हाणे) हे जखमी झाले. यावेळी काही वेळ वाहतूकीची कोंडी झाली होती.