नांदुरा (प्रतिनिधी) दुचाकीने अज्ञात ट्रकला दिलेल्या धडकेने झालेल्या अपघातात तीन भावांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नांदुरा बायपासवरील बुलढाणा रोड क्रॉस करणाऱ्या पुलावर ९ ऑगस्टला रात्री घडली. धक्कादायक म्हणजे अवघ्या २० दिवसांपूर्वी रक्षाबंधन असताना बहिणीला भेटून परत येत असताना हा भीषण अपघात झाला. उमेश विठ्ठल कांढरकर (२३), प्रशांत किसन कांढरकर (२३), नितीन किसन कांढरकर (२६, सर्व रा. झोडगा ता. मलकापूर जि. बुलढाणा) अशी मृतांची नावे आहेत.
या संदर्भात अधिक असे की, मलकापूर तालुक्यातील झोडगा येथील कंडारकर कुटुंबीयातील तीन चुलत भावंडे बहिणीच्या भेटीसाठी गेले होते. ९ ऑगस्ट रोजी रात्र तिघेही स्वगृही परतीच्या वाटेवर निघाले होते. मलकापूर खामगाव राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा उड्डाणपुलानजीक ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघातात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तिघाही भावांची बहिणीसोबतची ही शेवटची भेट ठरली.
तिघेही सख्खे चुलतभाऊ अनोराबाद येथून आंबोला जात असताना दुचाकी क्र. (एमएच २८ बीएन २७३९)चा अपघात झाला. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. किसन कांढरकर यांना दोन मुले होते. दोघांचाही या अपघातात घटनास्थळी मृत्यू झाला. मृत तिघेही अविवाहीत होते. अपघातानंतर नागरिकांनी अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू त्यांचा तत्पूर्वीच जागीच मृत्यू झालेला होता.
अपघातानंतर तिघांचेही मृतदेह नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच आमदार राजेश ऐकडे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. मृतांची ओळख पटविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. मृतक हे झोडगा येथील असल्याचे समोर आले. त्यानंतर आमदार राजेश ऐकडे यांनी झोडगा येथे संपर्क साधुन त्यांच्या कुटुंबियांना अपघाताची माहिती दिली. मात्र या घटनेने झोडगा गावावर शोककळा पसरली आहे. तर यावेळी कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोश केला होता.