चाळीसगाव (वृत्तसंस्था) तालुक्यातील बोरखेडा येथील २७ वर्षीय तरूणाने कौटुंबिक वादातून आपल्या दोन चिमुकल्यांसह धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र दिलीप जाधव (रा. बोरखेडा ता. चाळीसगाव) यांनी चिराग नावाचा ६ वर्षाचा मुलगा व खुशी नावाची ४ वर्षाच्या मुलीसह आपलं जीवन संपवलं होते.
चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील जितेंद्र जाधव हा पत्नी पुजा आणि दोन मुलांसह वास्तव्याला आहे. चाळीसगाव येथील जे.जे. आण्णा टावर या मक्तेदाराकडे जेसीबी चालक म्हणून तो काम करत होता. जितेंद्र जाधव आणि त्यांची पत्नी पुजा जाधव यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. दरम्यान, १३ फेब्रुवारी रोजी सकाळी जितेंद्रने चिराग व खुशी दोन्ही मुलांसोबत नगरदेवळा रेल्वेस्थानकाजवळ रेल्वेखाली आत्महत्या केली होती.
मयत जितेंद्र जाधवचे वडील यांनी दिलेल्या फिर्यादीत पूजा जितेंद्र जाधव, ईश्वर जिभाऊ जगताप (दोघं रा.बोरखेडा ता. चाळीसगाव) आणि एक अनोळखी इसम यांनी जितेंद्रला मारहाण करत अपमानित करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, तपासधिकारी रमेश चव्हाण यांनी ‘द क्लिअर न्यूज’सोबत बोलतांना सांगितले की, आत्महत्या प्रकरणात पत्नीच्या अनैतिक संबंधाची किनार आली समोर आली आहे. मयताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल.