जळगाव (प्रतिनिधी) हातात चॉपर व तलवारी सारखे धारदार शस्त्रे घेवून आलेल्या टोळक्याने भरचौकात तरुणावर हल्ला केला. त्यानंतर त्यांच्यातीलच एकाने त्याच्याकडील बंदूक एकावर रोखून धरीत ट्रीगर दाबून धरला. तर त्यांच्या इतर साथीदारांनी तेथे पडलेले दगड विटा मारुन सुनिल रामभाऊ चोरट (वय ३६, रा. हमालवाडा) यांना गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास शिवाजी नगरात घडली. याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं !
शिवाजी नगरातील हमालवाड्यात सुनिल रामभाऊ चोरट हे वास्तव्यास असून मंगळवारी रात्रीच्या सुमारास ते घरासमोर डिव्हाईडर टाकण्याचे काम करीत होते. यावेळी विशाल वाघ, शंभू उर्फ नरेंद्र दिलीप भोसले, भोपाली उर्फ विजय आहिरे, कार्तिक भोसले, वाल्मिक वाघ, जयेश राजू नन्नवरे उर्फ गटल्या, तुषार कन्हैयालाल सोनवणे, दिपक अहिरे हे हातात चॉपर व तलवारी घेवून त्याठिकाणी आले. यावेळी विशाल वाघ याने सुनिल चोरट यांच्या हातील थापी हिसकावून त्यांना घरी निघ असे म्हणाला. यावेळी कार्तिकने त्याचया हातातील चॉपर मारण्याच्या उद्देशाने फिरवला, परंतू सुनिल यांनी त्याचा वार चुकविल्यामुळे ते बचावले.
रिक्षाची काच फोडीत चालकावर चॉपरने केले वार !
सुनिल यांना मारहाण केल्यानंतर तेथूनच काही अंतरावर असलेल्या जयविजय चौकात उभ्या असलेल्या रिक्षाची हल्लेखोरांनी काच फोडली. यावेळी रिक्षाचे मालक जितेंद्र दिवाक- महाजन हे घराबाहेर आले असता विशाल वाघ याने त्याच्या हातातील चॉपरने त्यांच्या पाठीवर वार करीत गंभीर जखमी केले. सुनिल चोरट यांचा विशाल वाघ किंवा नऱ्या शिंदे यांच्यासोबत कुठलाही संबंध नसतांना त्यांना मारहाण केली.
खतमच करतो म्हणत रोखून धरली बंदूक !
शंभू भोसले याने खतमच करतो, असे म्हणत त्याच्या हातातील बंदूक सुनिल चोरट यांच्यावर रोखून धरत जीवेठार मारण्याच्या उद्देशाने ट्रिगर दाबून धरला. याचवेळी विशाल वाघ याच्या साथीदारांनी तेथे पडलेल्या विटा व फरशींनी सुनिल यांना मारीत त्यांना गंभीर जखमी केले. तर तेथे उभी असलेली त्यांची (एमएच १९ ईएच ०८०) क्रमांकाची दुचाकीला लाथ मारुन नुकसान केले.
दुसऱ्या दिवशी हल्लेखोरांविरुद्ध तक्रार !
चॉपर, तलवार व बंदूकीसारखे हत्यारे घेवून आलेली टोळी शिवीगाळ करीत असल्याचे बघताच तेथील नागरिकांनी घरात जावून दारे खिडक्या लावून घेतल्या. या दिवशी सुनिल चोरट हे घाबरलेल्या अवस्थेत दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. त्यानंतर बुधवारी सुनिल चोरट यांनी दिलेल्या तक्रारीवरुन विशाल वाघ, शंभू उर्फ नरेंद्र भोसले, भोपाली उर्फ विजय आहिरे, कार्तिक भोसले, वाल्मिक वाघ, जयेश राजू नन्नवरे उर्फ गटल्या, तुषार सोनवणे, दिपक अहिरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.