कल्याण (वृत्तसंस्था) कल्याण पूर्व भागातील आर. एल. बी. फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने एका महिलेशी उद्धट वर्तन करीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याविषयी चुकीचे विधान केले होते. हा प्रकार कळताच मनसेच्या कार्यकार्यकर्त्यांनी कंपनीच्या कार्यालयात जाऊन फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करून चांगलाच चोप दिला आणि त्याला माफी मागण्यास भाग पाडले.
कल्याण पूर्व भागातील काटेमानीवली परिसरात आर. एल. बी. या फायनान्स कंपनीची शाखा आहे. या शाखेतून एका महिलेने लोन घेतले होते. वारंवार या महिलेला इन्स्टॉलमेंट भरण्यासाठी फोन केला जात होता. महिला आपली व्यथा मांडण्यासाठी फायनान्स कंपनीच्या शाखेत पोहचली. याठिकाणी तिला कर्मचारी अनील भोगे यांनी आरेरावी केली. महिलेशी बोलत असताना या कर्मचाऱ्याने राज ठाकरे आले तरी काही फरक पडणार नाही, असं म्हटलं. महिलेने ही बाब मनसे पदाधिकाऱ्यांना सांगितली. मनसेचे पदाधिकारी उदय वाघमारे, विद्यार्थी सेना, महिला सेना पदाधिकारी इतर कार्यकर्ते तिथे पोहचले. त्यांनी अनील भोगेला या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. त्याला उठाबशा काढायला लावून माफी मागायला लावली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. ही घटना २३ फेब्रुवारीला संध्याकाळी घडली होती. आता त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
“कोरोनाचा काळ आहे. या काळात सर्व नागरिक त्रस्त झाले आहेत. फायनान्स कंपनीवाले अतिमुजोरपणे लोकांना त्रास देत आहेत. संबंधित महिलेने आम्हाला फोन करुन सर्व प्रकार सांगितला. राज ठाकरे यांचं नाव घेण्याचं काही कारणच नव्हतं. त्याची लायकीच नाही. त्यामुळे आम्ही त्याला मनसे स्टाईल धडा शिकवला”, अशी प्रतिक्रिया मनसे पदाधिकारी उदय वाघमारे यांनी दिला.