नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन २०२१ -२२ या वर्षासाठीचा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आज संसदेत सादर करणार आहेत. अर्थसंकल्प ‘कधी नव्हे इतका चांगला’ असणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार असून कोरोनामुळे फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी कोणत्या घोषणा केल्या जातील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कोरोना संकटातून सावरताना विकासाचं ध्येय गाठण्याचं आव्हान सरकारसमोर आहे. आरोग्य, पायाभूत सुविधा आणि शेजारी देशांमुळे निर्माण झालेल्या सीमासंघर्षांच्या पार्श्वभूमीवर संरक्षणासाठी भरीव तरतूदही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली असावी, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प सोमवारी संसदेत सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचाही हा तिसरा अर्थसंकल्प आहे. आरोग्यक्षेत्रातील पायाभूत सेवा-सुविधांसाठी तरतूद, बँकिंग क्षेत्रात सुधारणा आणि मागणीला चालना देण्यासाठी उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे. आर्थिक दृढीकरण आणि १५व्या वित्त आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करण्यावरही भर असेल. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर विविध वस्तूंची मागणी कमी झाल्याने खासगी कंपन्यांनी आपले उत्पादन कमी करून कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. दरम्यानच्या काळात अर्थव्यवस्थेला चालना मिळावी म्हणून सरकारने स्वतः खर्च करण्याचे ठरविले. त्यासाठी पायाभूत सुविधांचे प्रकल्प वाढविण्यात आले आहेत. मात्र जोपर्यंत खासगी क्षेत्र पुनरुज्जीवित होत नाही तोपर्यंत अर्थव्यवस्था पूर्ण क्षमतेने काम करू शकणार नाही. यासाठी खासगी क्षेत्राची गुंतवणूक वाढावी याकरिता अर्थसंकल्पात काय तरतुदी केल्या जातील याकडे अनेकांचे लक्ष आहे. तसेच देशात शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठीच्या तरतुदींकडेही अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे.















