जळगाव (प्रतिनिधी) रॉयल्टी भरण्याच्या माध्यमातून जळगाव महानगरपालिकेची आर्थिक फसवणूक केल्याबाबत आज राजीव रामदास महाजन यांच्या मे. मन्साई बॉयोमेडिकल वेस्ट एंटरप्रायजेस प्रा.लि.( हिरापन्ना अपार्टमेंट, पहिला मजला, पांडे चौक) यांना ३९ लाख १७ हजार २५९ रुपये व त्यावरील १२ टक्के व्याजासह रक्कम महानगरपालिकेच्या खजिन्यात ७ दिवसांच्या आंत भरणा करावा. अन्यथा आपण महानगरपालिकेची आर्थिक फसवणूक केल्याबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, अशा आशयाची नोटीस बजावण्यात आली आहे.
या संदर्भात अधिक असे की, माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश कडू भोळे यांनी या संदर्भात महापालिकेकडे तक्रार केलेली होती. त्यानुसार आज महापालिकेने नोटीस बजावत सात दिवसाच्या आत ३९ लाख १७ हजार २५९ रुपये व त्यावरील १२ टक्के व्याजासह रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले आहे. रक्कम जमा न केल्यास नियमानुसार कारवाई करण्याचा ईशारा देखील दिला आहे.
महापालिकेने बजावलेली नोटीस जशीच्या तशी !
उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, संदर्भ क्रं. १ व २ नुसार जैविक घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम १९९८ व सुधारीत २००० नुसार शहरात निर्माण होणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावणेसाठी मा. महासभा ठराव क्रं.६६ दि.११/०२/२००५ अन्वये आपण सामाईक सुविधा म्हणून प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. संदर्भ क्रं. ३ नुसार आपण दि.०२/०८/२००५ रोजी म.न.पा. करारनामा करुन दिलेला आहे.
त्याअनुषंगाने करारनाम्यातील अटी शर्तीनुसार अट क्रं. २१ नुसार जळगांव महानगरपालिका हद्दीतील व बाहेरील २०० कि.मी.च्या आतील वैद्यकिय व्यवसायीकांकडून जैविक घनकचरा हाताळणी व व्यवस्थापन अंतर्गत घेण्यात येणारा जैविक कचरा आमचेकडील वाहने व कर्मचारी यांचेकडून प्रस्तावात नमुद केलेनुसार फी वसूली करुन जमा करण्यात येईल. अट क्रं. २ नुसार अनुदान (रॉयल्टी) ची रक्कम दर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत एकूण जमा झालेल्या रक्कमेतून महापालिकेच्या खजिन्यात रोखीने किंवा चेकद्वारे जमा करणेस बांधीत आहोत असे नमुद असतांना सुध्दा आपण म.न.पा. नियमानुसार रॉयल्टीचा भरणा केलेला नाही.
संबंधीत मन्साई बॉयोमेडिकलला परवानगी मिळाली तेव्हापासून संस्थेचे डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, रेल्वे हॉस्पीटल भुसावळ, ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव, भुसावळ व इतर ठिकाणील बिले स्विकारली. पण म.न.पा.ला दाखविली नाही व रॉयल्टीही भरली नाही. म्हणजेच फसवणूक करुन अटी व शर्तीचा भंग केलेला आहे. जमा होणाऱ्या रकमेचा परस्पर वापर करुन विल्हेवाट लावून फसवणूक केलेली आहे. तसेच कोडिव -१९ कोरोना हॉस्पीटल मधील जैविक घनकचरा जमा करण्यात आलेला आहे. त्याची सुध्दा म.न.पा. स रॉयल्टी भरलेली नसल्याची अशा आश्याची तक्रार प्राप्त झालेली आहे. त्यामुळे रॉयल्टी भरण्याच्या माध्यमातून जळगाव महानगरपालिकेची आर्थिक फसवणूक केल्याबाबत आपणा नोटीस देण्यात आलेली होती.
संदर्भ क्रं. ६ नुसार आपण अँड प्रकाश बी. पाटील यांचे मार्फत नोटीसीचे उत्तर सादर केलेले असून सदरचे उत्तर समाधानकारक नाही. तसेच याबाबत तक्रारीत नमुद असलेल्या वैद्यकिय व्यवसायीक यांचेशी केलेल्या पत्रव्यवहार केले असता आपण महानगरपालिकेला रॉयलटी भरण्याबाबत फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्यानुसार आपणाकडून म.न.पा.स झालेल्या आर्थिक नुकसानभरपाई वसूल करण्यासाठी मा. आयुक्त यांचे दि. २३/०६/२०२१ रोजीच्या निर्देशानुसार संदर्भ क्रं. ७ नुसार प्रकल्प सुरु झाल्यापासून आजपावेतो जळगांव शहर महानगरपालिका हद्दीतील व बाहेरील २०० कि.मी. आतील वैद्यकिय व्यवसायीकांकडून जमा होणाऱ्या रक्कम बँकेत जमा केलेबाबतचे स्टेटमेंट, संपुर्ण पावती पुस्तक, २००५ ते २०२१ पर्यंत ऑडीट रिपोर्टच्या छायांकित सत्यप्रतीसह व इतर आवश्यक दस्ताऐवज तपासणी करीता महानगरपालिकेस सादर करणेसाठी पत्र देण्यात आलेले होते.
म.न.पा.चे मा. मुख्यलेखा परिक्षक यांनी आपले ऑर्डीट रिपोर्टची पडताळणी केली असता आपण भरलेली रॉयल्टी व प्रत्यक्षात ऑर्डीट रिपोर्टप्रमाणे भरावयाची रॉयल्टी याबाबत सन २००५-०६ ते २०१९-२० पर्यंत रक्कम रु.२९,१७,२५९/- व सन-२०२०-२१ ची ऑर्डीट रिपोर्ट नसल्यामुळे अंदाजीत रक्कम रु. १०,००,०००/- असे एकूण रक्कम रु. ३९,१७,२५९/- व त्यावरील १२ % व्याजासह वसूल करण्याचे नमुद केलेले आहे.
तसेच आपणाकडून सादर करण्यात आलेले ऑर्डीट रिपोर्ट व अन्य कागदपत्रांनुसार भविष्यात वसूलपात्र रक्कमेपेक्षा जास्त रक्कम निघाल्यास सदरची रक्कम आपणास भरावी लागेल या अटीवर आपण प्रथम रक्कम रु.३९,१७,२५९/- व त्यावरील १२ % व्याजासह महानगरपालिकेच्या खजिन्यात ७ दिवसांच्या आंत भरणा करावा. अन्यथा आपण महानगरपालिकेची आर्थिक फसवणूक केल्याबाबत आपणावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, अशा आशयाची नोटीस जळगाव महानगरपालिकेचे सहा. आयुक्त (आरोग्य) अभिजीत मिलिंद बाविस्कर यांच्या स्वाक्षरीने २० जुलै रोजी बजावण्यात आली आहे.