यावल (प्रतिनिधी) यावल नगरपरिषदेमार्फत वैशिष्टपूर्ण योजनेअंतर्गत लाख लिटर क्षमतेच्या नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम व पाणीपुरवठ्यासाठी विकसित भागात नवीन मुख्य पाईपलाईन टाकण्यात आली. त्या मुख्य पाईपलाईन वरून नळ जोडणी करताना खड्डे खोदणाऱ्या मजुरा सोबत यावल नगरपरिषदेची बेकायदा अनधिकृत भागीदारी असल्याने खड्डे खोदणारा मजूर हा नळ जोडणी करणाऱ्या नागरिकांकडून वाजवीपेक्षा जास्त रक्कम घेऊन कोणतीही पावती न देता आर्थिक लूट करीत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
तसेच या कामकाजाकडे यावल नगरपरिषदेतील काही नगरसेवकांसह यावल शहरातील सक्रीय नसलेली ग्राहक संघटना, (ग्राहक संघटनेचे कोणतेही ठोस काम आजपर्यंत न झाल्याने) विरोधक, आणि काही विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मुग गिळुन गप्प असल्याने सर्वसामान्य नागरिकांमधे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
विकसित भागात ज्यांनी आधी यावल नगरपरिषदेकडून पाणीपुरवठा/ नळ कनेक्शन घेतलेले होते आणि आहे. अशा जुन्या नळ कनेक्शन धारकांना वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत फक्त २ हजार रुपये खर्च घेऊन यावल नगरपरिषदेने नवीन पाईप लाईन वरून नळ कनेक्शन दिले. परंतु विकसित भागात गेल्या २० ते २५ वर्षापासून खाजगी विहिरीवरून लोकवर्गणीतून पाईप लाईन टाकून पाणीपुरवठा सुरू होता अशा ग्राहकांकडून नगरपालिकेने ५ हजार ६५० रुपये आणि पाईप लाईन पासून खड्डे खोदण्यासाठी व इतर साहित्य मिळून एकूण खर्च म्हणून २ हजार रुपये नळ कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांकडून घेण्यात येत आहे. असे शेकडो ग्राहक आहेत. यात नळ कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना मात्र नगरपरिषदेकडून फक्त ५ हजार ६५० रुपयाची रितसर पावती देण्यात येत आहे. परंतु खड्डे खोदणारा ठेकेदार/मजूर हा खड्डे खोदण्याच्या व इतर साहित्याच्या नावाखाली प्रत्येक नळ कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना नागरिकांना कोणतीही पावती न देता प्रत्येकी २ हजार रुपये बेकायदेशीर अनधिकृतपणे घेऊन शेकडो ग्राहकांची व नागरिकांची आर्थिक लूट करीत आहे.
याबाबत यावल नगरपरिषदेने जनतेच्या माहितीसाठी कोणत्याही प्रकारे जाहीर सूचना किंवा दवंडी दिलेली नसल्याकारणामुळे यात खड्डे खोदणाऱ्या मजुरा सोबत ठेकेदार यावल नगरपरिषदेची हात मिळविणी. तसेच अवैध भागीदारी असल्याचे सुद्धा बोलले जात असून या सर्व मनमानी कारभाराकडे नगरपालिकेतील काही सुज्ञ नगरसेवकांचे आणि ग्राहक संघटना तसेच सामाजिक विविध काही संघटना यावल शहरातील विरोधक मूग गिळून गप्प असल्याने त्यांनी खड्डे खोदणाऱ्या मजूर ठेकेदाराकडे लक्ष केंद्रित करून २ हजार रुपयाची पावती नळ कनेक्शन घेणाऱ्या नागरिकास ग्राहकास देण्याची कार्यवाही करावी असे न केल्यास पुढील कार्यवाहीस यावल नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभाग प्रमुख जबाबदार राहील, असे सुद्धा बोलले जात आहे.