नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आग लागली आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात राज्यपालांसाठी आरक्षित असलेल्या कक्षामध्ये सोमवारी सकाळी ही आग लागली. शॉर्ट सर्किट हे या आगीचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान महाराष्ट्र सदनातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे.
आज सकाळी आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या चार गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांच्या मदतीने ही आग आता आटोक्यात आणण्यात यश आलं आहे. या आगीमुळे राज्यपाल कक्षातल्या मालमत्तेचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र, आता ही आग विझवण्यात आली आहे. सदनातल्या इतर कोणत्याही भागाला या आगीचा फटका बसलेला नाही, अशी माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग सकाळी साधारण साडेनऊ वाजेच्या सुमारास लागली. महाराष्ट्र सदनातील जवानांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असल्याचे सांगितले जात आहे.