अमरावती (वृत्तसंस्था) दोन वर्षांपूर्वी फेसबुकवर एकमेकांशी ओळख झालेल्या तरुण तरुणींमध्ये प्रेम झाले. त्यानंतर तरुणाने तरुणीला लग्नाचे आमिष देऊन वारंवार शारीरिक शोषण केले. यातून तरुणीला गर्भधारणा झाली. त्यानंतर औषध देऊन घरीच तरुणीचा गर्भपात केला. धक्कादायक म्हणजे शारीरिक शोषण सुरूच ठेवल्यामुळे पिडीत तरुणीला आता पुन्हा दोन महिन्यांची गर्भधारणा झाली आहे. या प्रकरणी पिडीत तरुणीच्या तक्रारीवरून तरुणाविरुद्ध बलात्कार, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा तसेच गर्भपात करवून देण्याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आकाश भाऊराव आमदरे (२७, रा. घोडदेव, तालुका मोर्शी जि. अमरावती) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. आकाश आणि पिडीत तरुणी यांच्यात साधारण दोन वर्षांपूर्वी फेसबुकवर ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर एक दिवस आकाशने तरुणीला स्वतःच्या चारचाकी वाहनात बसवून फिरायला जाऊ असे सांगितले. त्यावेळी आकाशने तिला ‘आपण लवकरच लग्न करू’ असे आमिष दिले आणि त्याचवेळी तिचे शारीरिक शोषण केले. त्यानंतर वारंवार आकाश तिला लग्नाचे आमिष देऊन शारीरिक शोषण करू लागला.
दरम्यान, यातूनच तरुणीला गर्भधारणा झाली. त्यावेळी आकाशने तिला औषध दिले आणि घरीच तिचा गर्भपात करवून घेतला. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी तरुणीवर अत्याचार केला. तरुणी आता पुन्हा दोन महिन्यांची गर्भवती आहे. पिडीत तरुणीने आकाशला लग्नाबाबत विचारले असता, तो टाळाटाळ करायला लागला. तसेच भेटण्यासही नकार देऊ लागला. एवढेच नव्हे तर तरुणीने तक्रारीत नमूद केले आहे की, पुन्हा गर्भपात करून घे, नाहीतर तुला मारतो. अशी धमकी आकाश देत आहे, त्यामुळे भेदरलेल्या तरुणीने शनिवारी नांदगाव पेठ पोलिस ठाणे गाठून आकाशविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीवरून बलात्कार करणे,अॅट्रॉसिटी, गर्भपात करवून घेण्घेयासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.