भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील पोलिस ठाण्यातंर्गत अनेक गंभीर गुन्हे दाखल असणारे रेकॉर्डवरील नगरसेवकासह पाच गुन्हेगारांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी भुसावळातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.
पिस्तूल वापरणे, हत्यारे वापरणे, खूनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, साहित्यासह, दरोड्याची तयारी, गैरकायदा मंडळी जमवून शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी देऊन दुखापत करणे, नुकसान करणे यासारखे गुन्हे करून दहशत निर्माण करणे, शहर पोलिस ठाण्यात खूनाचा प्रयत्न करणे आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या खरात बंधूसह अमोल ऊर्फ चिन्ना श्याम खिल्लारे या पाचही जणांना पोलिस अधीक्षकांनी दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी हद्दपारीचे आदेश बुधवारी (ता. ११) काढले. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव तयार करून पोलिस अधीक्षकांकडे पाठविल्यावर अधीक्षक मुंढे यांनी पाचही जणांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केल्याचे आदेश काढले.
या पाचही जणांना केले हद्दपार
जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे दाखल झालेल्या प्रस्तावाची शहानिशा चौकशी करून गोपनीय जबाब नोंद करून अधीक्षक मुंढे यांनी टोळी प्रमुख आतिष रवींद्र खरात (वय २५, रा. समतानगर, भुसावळ), टोळी सदस्य नगरसेवक राजकुमार ऊर्फ सनी रवींद्र खरात (२७, रा. समतानगर, भुसावळ), हंसराज रवींद्र खरात (१९, समतानगर, भुसावळ), राजन ऊर्फ गोलू रवींद्र खरात (२२, रा. समतानगर, भुसावळ) आणि अमोल ऊर्फ चिन्ना खिल्लारे (२५, रा. न्यू वॉटर टॅक, हनुमान मंदिराजवळ, भुसावळ) यांचा हद्दपारीत समावेश आहे.