पुणे (वृत्तसंस्था) पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी अधिकृत माहिती दिली आहे. मृत्यू झालेले बांधकाम मजूर असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. “आग लागलेल्या ठिकाणी कोव्हिशिल्ड लसीचं उत्पादन किंवा साठवणूक होत नव्हती. पूर्णपणे दुसऱ्या ठिकाणी हे काम सुरु होतं. पण दुर्दैवाने पाच जणांना जीव गमवावा लागला असल्याचं,” मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे.
“सुरुवातीला चार लोक अडकल्याची माहिती मिळाली होती. पुणे महापालिका आणि अग्निशमन दलाने त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. आग १०० टक्के विझल्यानंतर आपली लोकं शेवटच्या मजल्यावर पोहोचली तेव्हा मजला खाक झाला होता आणि पाच जणांचे मृतदेह पडले होते. पाचही जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला,” असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीदेखील यासंबंधी माहिती दिली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, “जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासोबत मी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेल्डिंगचं काम सुरु असताना दुपारी २ वाजता आग लागली. वेल्डिंगचं निमित्त होतं मात्र तेथील ज्वलनशील सामानामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली. महापालिकेचे पाच टँकर आणि तीन पाण्याचे टँकर तात्काळ बोलावण्यात आले होते. संपूर्ण आग विझवण्यात आली असून दोन ते तीन तास लागले. संपूर्ण आग विझली असून सर्व काही नियंत्रणात आहे”.
तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या चारही कर्मचाऱ्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे, अशी माहिती सुरुवातीला देण्यात आली होती. याबाबत सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनीही एक ट्वीट केलं होतं. ‘आगीत अडकलेल्या सर्वांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. आगीत कुणीही जखमी झालेलं नाही व कोणतीही जीवितहानी झालेली नाही. काही मजल्यांचे मात्र नुकसान झाले आहे’, असे अदर पुनावाला यांनी नमूद केले होते. पुनावाला यांच्या ट्वीटनंतर काही वेळातच या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आग आटोक्यात आल्यानंतर इमारतीत तपासणी केली असता पाच मृतदेह आढळून आले आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
आग आटोक्यात आल्यानंतर शेवटच्या मजल्यावर जवान पोहचले असता तो मजला जळून खाक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिथेच पाच मृतदेह आढळले आहेत. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. ते सीरमचे कर्मचारी आहेत की बांधकाम कर्मचारी ते आताच सांगता येणार नाही. मृतदेह ताब्यात घेऊन पुढे पाठवण्यात आले आहेत, असे मोहोळ यांनी सांगितले. इमारतीचं बांधकाम चालू होतं. वेल्डिंगचे काम सुरू असताना ठिणगी उडून आग लागल्याचे सांगितले जात आहे मात्र, अद्याप नेमके कारण स्पष्ट झालेले नाही, असेही मोहोळ म्हणाले.