जम्मू काश्मीर (वृत्तसंस्था) जम्मू कश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील राणीपोरा परिसरातील क्वारीगाम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. परिसराची नाकाबंदी करून सुरक्षा दलाकडून शोध मोहीम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सुरक्षा दलाला अनंतनाग जिल्ह्यातील क्वारीगाम येथे दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर भारतीय सैन्याने सर्च ऑपरेशन हाती घेतलं. सैन्य दलासोबत पोलिसांचे आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तरित्या कारवाई सुरू केली. याच दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला. भारतीय सैन्याने दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण करण्यास सांगितले मात्र, दहशतवाद्यांनी आपला गोळीबार सुरूच ठेवला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला भारतीय सैन्याने सुद्धा प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. या कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अद्यापही या परिसरात सैन्याकडून सर्च ऑपरेशन सुद्धा सुरू आहे.
















