जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाचे ४६ नगरसेवक विजयी झाले असून शिवसेना शिंदे गटाचे २२ व राष्ट्रवादीचा १ नगरसेवक निवडून आला आहे. तर, शिवसेना ठाकरे गटाचे पाच नगरसेवक विजयी झाले असून प्रभाग क्रमांक १ ड मधून अपक्ष उमेदवार भारती सागर सोनवणे विजयी झाल्या आहेत. भारती सोनवणे यांनी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिल्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांची संख्या २२ वरून २३ झाली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा एकमेवर उमेदवार निवडून आलेला असल्यामुळे त्यांना ना विरोधी पक्ष नेता, ना स्वीकृत नगरसेवक, ना गटनेता पदाची संधी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
महानगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांना आता विभागीय आयुक्तांकडे गटाची नोंदणी करावी लागणार आहे. येत्या दोन दिवसात चारही पक्षांकडून गट नोंदणी करण्यात येईल, तसेच गटनेता नियुक्त झाल्यानंतर व दि. २२ रोजी आरक्षण जाहीर झाल्यानंतर महापौर, उपमहापौरांची निवड करण्यात येईल, त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विभागी आयुक्तांना पत्र पाठविण्यात येईल, विभागीय आयुक्तांकडून पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल, त्यांच्या उपस्थितीत महासभा घेण्यात येणार असून त्या महासभेत महापौर, उपमहापौर पदाची निवड करण्यात येणार आहे.
स्वीकृत नगरसेवकांची होणार निवड महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांच्या संख्ये नुसार स्वीकृत नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. पुर्वी ७५ नगरसेवक प्रत्यक्ष जनतेतून व ५ नगरसेवक स्वीकृत म्हणून निवडले जात होते. आता स्वीकृत नगरसेवकांच्या संख्येत वाढ झाली असून स्वीकृत नगरसेवकांची संख्या ५ वरून ७ झाली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट व शिवसेना ठाकरे गटाला स्वीकृत नगरसेवकांची संधी मिळणार आहे. यामध्ये भाजपाला ४, शिवसेना शिंदे गटाला २ व शिवसेना ठाकरे गटाला १ स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
















