छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) राज्य शासनाच्या वन विभागांतर्गत घेण्यात येणाऱ्या वनरक्षक पदाच्या लेखी परीक्षेत बसलेल्या परीक्षार्थीना फोनद्वारे थेट उत्तरे पाठवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरच्या केम्ब्रिज परिसरातील बजरंगनगर भागात असलेल्या शिवराणा करिअर सेंटरवर एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी सायंकाळी छापा मारला. यात विनोद प्रतापसिंग डोभाळ यास अटक केली. तर शिवराणा करिअर सेंटरचा चालक सचिन गोमलाडू आणि लोधवाड हे दोघे पळून गेले.
एमआयडीसी सिडको पोलिसांनी माहितीनुसार, कॅम्ब्रिज परिसरातील बजरंगनगर येथे शिवराणा करिअर अॅकॅडमीमध्ये वन विभागाच्या वनरक्षक पदासाठी होणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका येणार असून, त्या ठिकाणाहून उत्तरे परीक्षार्थीना फोनद्वारे कळवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली दुपारी ३ ते ५ या दरम्यान परीक्षेचा वेळ होता. पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांनी पोलीस कर्मचारी संतोष गायकवाड आणि प्रकाश सोनवणे यांना अॅकडमी जॉईन करायची आहे, असे सांगून अकडमी चालक सचिन गोमला याच्याकडे पाठवले.
पोलीस कर्मचाऱ्यांनी गोमलाडू याच्याशी भेट घेतल्यानंतर अॅकेडमीची माहिती घेत असताना त्यांना एका बाजूला दोन ते तीन जण मोबाईल व लॅपटॉप घेऊन बसलेले दिसले, मिळालेल्या माहितीप्रमाणे संशयित दिसल्याने प्रकाश सोनवणे यांनी आतून फोनद्वारे बाहेर उभ्या असलेल्या पोलिसाच्या टीमला बोलावून घेतले.
संशयित आरोपी विनोद डोभाळची चौकशी !
पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांनी विनोद डोभा याची चौकशी केली असता त्याने वनरक्षक पदासाठी सुरू असलेल्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेची उत्तरे परीक्षार्थीला फोनद्वारे सांगण्यात येत असल्याची माहिती दिली. परीक्षार्थीचा हॉलतिकीट क्रमांक पोलिसांच्या हाती लागला आहे. तसेच चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गौतम पातारे, पोलीस उपनिरीक्षक जाधव, पोलीस कर्मचारी संतोष गायकवाड, संतोष सोनवणे, देविदास काळे,प्रकाश सोनवणे, पठाण यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घुगे करत आहेत.
१११ प्रश्नपत्रिकेचे फोटो !
पोलिसांनी छापा टाकला तेव्हा पाचही जण मोबाइलवर उत्तरे पुरवत होते. जप्त एका मोबाइलमध्ये व्हॉट्स अॅपला उपसरपंच सचिन कारोळ या नावावरून पेपरचे १११ फोटो प्राप्त झाले. हे नागपूरच्या एका परीक्षार्थीने पाठवलेले फोटो आढळले. एका फोटोवर पेनने क्रमांक टाकून त्यापुढे आकडे लिहिलेले होते. त्या प्रश्नांची उत्तरे परीक्षार्थीना दिल्याची कबुली डोभाळने दिली. शनिवारी त्याने राजपूतसोबत पार्टी केली. त्याने डोभाळला उत्तरे देण्यासाठी ५० हजार रुपये देण्याचे कबूल केले. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने प्रसिद्ध केले आहे.