धरणगाव (प्रतिनिधी) शहरालगत गट क्र. १२८० मधील वनिकरणात आज दुपारी अचानक आग लागली. यामुळे शेकडो रोपे,वृक्ष जळुन खाक झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आगीचे नेमकं कारण अद्याप समजू शकले नाही.
दुपारी दीड वाजेच्या सुमारास लागली भीषण आग
धरणगाव जवळ असलेल्या कंडारी रस्त्यावरील १३२ केव्हिच्या मागील वनविभागाच्या गट नंबर १२८० मध्ये आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत हजारो रोपे,झाडे आणि वनस्पती जळून खाक झाल्याचे दिसून आले. आग शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचली. परंतु सुदैवाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही. एरंडोल वनविभागाचे वनपाल अनिल साळुंखे यांनी घटनास्थळी भेट दिली. परंतू आग लागल्याचे नेमकं कारण समजू शकले नाही. पालिकेच्या अग्निशमनच्या २ बंबांनी आग विझवण्याचे काम केले.
अनेक झाडे आणि वनस्पती जळून खाक
सन २०२१-२२ ह्या वर्षी जळगाव वनविभाग धरणगाव अंतर्गत, वनक्षेत्र एरंडोलच्या नियतक्षेत्र राजवड गट क्र १२८० येथे राज्य योजना अंतर्गत वनीकरण भरगच्च कार्यक्रम राबविण्यात येऊन मिश्र रोपवन पावसाळ्यात १५.०१ हेक्टर जागेमध्ये लावण्यात आले होते. या रोपवणात एकूण ९२३७ खड्ड्यात अनेक प्रजातीचे रोपे लावण्यात आले होते. परंतु आज लागलेल्या आगीमध्ये अनेक वृक्ष जळून खाक झाले. तसेच या रोपवणात असलेले विविध प्रकारची अनेक झाडे आणि वनस्पती सुध्दा जळुन नष्ट झाली आहेत.
आग विझविण्यात यांनी केली मदत
सदरील वनक्षेत्राच्या परिसराला आग लागल्याने वनविभागाचे वनपाल अनिल साळुंखे, वनरक्षक एन एन क्षीरसागर, कर्मचारी शांताराम पाटील, सागर झुंझारराव व गावातील राजेंद्र वाघ, पवन माळी, समाधान माळी, देविदास महाजन, बापू बडगुजर, भूषण महाजन, राहुल माळी नपाचे टँकर चालक आदी नागरिकांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला. पण आग आटोक्यात लवकर आटोक्यात येत नव्हती. या आगीत लाखो रुपयांचा शासनाचा नुकसान झाला असून संपुर्ण रोपवन जळुन खाक झाले आहे. यामुळे शासनाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.
प्रशासनाने उपाययोजना कराव्यात…
धरणगाव जवळील वनीकरणात हजारो पशु, पक्ष्यांचे वास्तव्य आहे. आज लागलेल्या आगीमुळे हजारो झाडे, पक्षी होरपळल्याचा धोका आहे. याकडे संबंधित वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून आले. याबाबत उपाययोजना करुन भविष्यात आग लागणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. यातून वृक्ष आणि वन्यजीव, प्राण्यांचे संरक्षण होईल. दरम्यान, या आगीची चौकशी करून सबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाघ व परिसरातील गावकऱ्यांनी केली आहे.