अडावद ता. चोपडा (प्रतिनिधी) खोटी सही करुन बनावट दस्तऐवज तयार करून जळगाव धर्मदाय आयुक्त यांना बनावट नाहरकत पत्र बनवुन पत्र खरे आहे, असे भासवून सादर केल्याप्रकरणी तब्बल १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या गुन्ह्यात कट कारस्थान करुन शिक्षक भर्ती केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.
या संदर्भात महेंद्र वसंतराव देशमुख (वय ५३, रा. अडावद ता. चोपडा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, बाळासाहेब चिंतामण देशमुख रा. अडावद ता. चोपडा, २) रतिलाल सुका महाजन रा. अडावद, ३) जिजाबराव यादवराव देशमुख रा. अडावद, ४) शांताराम यादव कोळी रा. अडावद, ५) रामकृष्ण हरचंद पाटील रा. अडावद, ६) मीना बाळासाहेब देशमुख रा. अडावद, ७) नंदकुमार जगदीशराव देशमुख रा. देशमुख नगर चोपडा, ८) मनोज रामराव देशमुख रा. अडावद, ९) प्रमोद जिजाबराव देशमुख रा. सार्वजनिक विद्यालय अडावद, १०) विजय शांताराम कोळी रा. अडावद, ११) संदीप युवराज पाटील रा. कोठारी नगर अडावद, १२) सुभाष फकीरा पाटील रा. बजरंग पार्क बापुजी कॉम्प्लेक्स च्या मागे चोपडा, १३) शांताराम रामदास गवळे रा. कोठारी नगर अडावद, १४) अशोक शिवराम कदम रा. सार्वजनिक विद्यालय अडावद या सर्व संशयित आरोपींनी संगनमत करुन १ ऑक्टोंबर २०२१ रोजी सर्व १४ संशयित आरोपींनी महेंद्र देशमुख हे अडावद परीसर शिक्षण मंडळ कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष पदावर असताना श्री. देशमुख यांची खोटी सही करुन बनावट दस्तऐवज तयार केला. तसेच जळगाव धर्मादाय आयुक्त यांना बनावट नाहरकत पत्र बनवुन पत्र खरे आहे असे भासवून सादर केले. संस्थेत स्व:ताच्या फायद्यासाठी कट कारस्थान करुन शिक्षक भर्ती केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास स. फो जगदीश कोळंबे हे करीत आहेत.