धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील प्रभाग रचना बनवितांना प्रभाग क्रमांक ४ मधील खाटिक वाडा हा प्रभाग क्रमांक ५ मध्ये देखील समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच मुख्य नाला असलेला ‘धरणी नाला’ विचारात घेतलेला नसल्याचा आरोप करत प्रभाग रचनेवर माजी नगरसेवक हाजी शेख इब्राहीम यांनी हरकत घेतली आहे.
हाजी शेख इब्राहीम यांनी घेतलेल्या हरकतीत म्हटले आहे की, प्रभाग रचना बनवितांना प्रभाग क्रमांक ४ मधील खाटिक वाडा हा प्रभाग क्रमांक ५ मध्ये देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे. प्रभाग क्रमांक ३ मध्ये प्रभाग क्रमांक ४ मधील मशीद अलीचा भाग प्रभाग क्रमांक १ मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
प्रभाग रचना बनवितांना मुस्लीम समाजाच्या भागांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. जे नियमानुसार चुकीचे आहे. संपूर्ण नगरपालिका हद्दीतील मुस्लीम समाजाच्या भागांचे वर्गीकरण केले असून त्यामुळे मुस्लीम समाज विभाजित झाला आहे. प्रभाग रचना बनवितांना शहरातील मुख्य नाला असलेला ‘धरणी नाला’ विचारात घेतलेला नाही.
प्रभाग क्रमांक १ ते ११ प्रभागात प्रत्येक प्रभागात मुस्लीम समाज कश्या प्रकारे विभागाला जाईल याची पूर्ण काळजी मुद्दामहून घेतल्याचे दिसून येते. ज्यामुळे मुस्लीम समाजाचे प्रतिनिधी निवडून येवू नये, अशी काळजी घेण्यात आल्याचे दिसून येते. यामुळे संबंधित यंत्रणा निष्काळजी पणे निवडणूक प्रक्रिया राबवीत असल्याचे दिसून येते अथवा कुणाच्या तरी दबावाला बळी पडून प्रभाग रचना बनविली असल्याचे दिसून येते.
प्रभाग रचना बनवितांना मुस्लीम समाजावर अन्याय झाला आहे. तरी संपूर्ण प्रभाग रचना नव्याने व त्रयस्त यंत्रणेमार्फत बनविण्यात यावी. प्रत्येक प्रभागात रस्त्यांचे, गल्ल्यांचे, भागाचे विभाजन करण्यात आले आहे. नगरपालिका निवडणुकीचा आधी प्रकाशित झालेला कार्यक्रम पुन्हा घेण्यात येत आहे. तरी जुना कार्यक्रम रद्द करून पुन्हा नव्याने निवडणूक कार्यक्रम घेण्यात यावा.
जुनाच कार्यक्रम पुढे सुरु ठेवण्यात आला आहे. वास्तविक शासनाने पूर्वीचा कार्यक्रम रद्द केला असल्याचे आदेश / नोटिफिकेशन काढले होते. तरी देखील तोच कार्यक्रम पुढे सुरु ठेवण्यात आला आहे. जुनाच निवडणूक कार्यक्रम पुढे चालू ठेवल्याने हरकत घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. सदर प्रभाग रचना नव्याने व त्रयस्त यंत्रणेमार्फत बनविण्यात यावी. असेही हाजी शेख इब्राहीम यांनी आपल्या हरकतीत म्हटले आहे.
















