जळगाव (प्रतिनिधी) घरकुल प्रकरणात दाेषी ठरविण्यात आलेले माजी आमदार प्रा. चंद्रकांत साेनवणेंसह भाजपचे नगरसेवक दत्तात्रय काेळी यांच्या शिक्षेला सर्वाेच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे दाेघांचाही निवडणूक लढण्याचा मार्ग माेकळा झाला आहे.
घरकुल घाेटाळ्यात ३१ आॅगस्ट २०१९ राेजी ४८ जणांना दाेषी ठरवले हाेते. त्यात काही महिन्यातच माजी आमदार जैन वगळता उर्वरीत आराेपींना जामीन मंजूर झाला हाेता. दरम्यान, प्रा. चंद्रकांत साेनवणे व नगरसेवक दत्तात्रय काेळी यांनी सर्वाेच्च न्यायालयात अपील दाखल केले हाेते. त्यात गुरूवारी सुनावणी झाली. शिक्षेला सर्वाेच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे दोघांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे माजी आमदार सुरेश जैन यांना देखील नुकताच घरकुल प्रकरणात नियमित जामीन मंजूर झाल्यानंतर ते जळगावात येऊ शकले आहेत. दुसरीकडे याआधी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना देखील सुप्रीम कोर्टातून दिलासा मिळालेला आहे. याच आधारावर माजी आमदार सोनावणे व दत्तात्रय कोळी यांनी आपल्याला देखील देवकर यांच्या प्रमाणे दिलासा मिळावा, अशी विनंती न्यायालयाकडे केली. त्यानुसार सुप्रीम कोर्टाने दोघांना दिलासा आहे. दरम्यान, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या घरकुल प्रकरणातील शिक्षेवरील स्थगितीबाबत दाखल याचिका सुप्रीम कोर्टाने नोव्हेंबर २०२१ मध्ये फेटाळून लावली होती. घरकुल प्रकरणात गुलाबराव देवकर यांना दिलेल्या शिक्षेस मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने आणि त्यांच्या जिल्हा बॅंकेच्या उमेदवारी अर्जावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्याबाबत न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार देऊन याचिका फेटाळून लावल्या होत्या.