धरणगाव (प्रतिनिधी) येथील एकशे आठ वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या शतकोत्तर पी.आर.हायस्कूलचा माजी विद्यार्थी तथा बालाजी काॅम्पुटरचा संचालक स्वप्नील भाटिया याने एलएलबी परीक्षेत घवघवीत यश संपादन करून वकील झाल्याबद्दल शाळेच्या वतीने आज सत्कार करण्यात आला.
धरणगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रविकिरण बिऱ्हाडे साहेब यांच्या हस्ते त्याचा शाल,बुक आणि बुके देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे हे होते. तर मंचावर शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत ठाकूर, पर्यवेक्षक कैलास वाघ, ज्येष्ठ शिक्षक उमाकांत बोरसे हे उपस्थित होते. शाळेने दिलेल्या संस्काररूपी आणि ज्ञानरूपी भांडवलावरच मी केवळ कागदोपत्रच नव्हे तर माणसंही जोडू शकलो. या शाळेने मला सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक संवेदनशीलता शिकवल्यानेच मी कायद्याची परीक्षा उत्तीर्ण करू शकलो, अशा शब्दात स्वप्नीलने आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसी मेजर डी.एस.पाटील यांनी तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक बापू शिरसाठ यांनी केले.