जळगाव (प्रतिनिधी) मारुती सुझुकी इको वाहनाच्या सायलेंसरची चोरी करणा-या टोळीतील चौघांपैकी तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अमळनेर येथून अटक केली आहे. मनिष उर्फ सनी रविंद्र महाजन रा. शिरुड नाका, श्रीराम कॉलनी अमळनेर, शरद उर्फ टकल्या दिलीप पाटील (रा. राजाराम नगर अमळनेर) आणि निखील संतोष चौधरी (रा. राजाराम नगर अमळनेर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघां संशयितांची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे मारुती सुझुकी कंपनीच्या इको वाहनाचे सायलेंसर चोरणा-या अमळनेर येथील मनिष उर्फ सनी महाजन यास सुरुवातीला ताब्यात घेण्यात आले. अधिक चौकशीअंती त्याचे दोघे साथीदार शरद उर्फ टकल्या दिलीप पाटील आणि निखील संतोष चौधरी या दोघांना देखील क्रमाक्रमाने ताब्यात घेण्यात आले. अटकेतील तिघांनी आपला गुन्हा कबुल केला. त्यांचा चौथा साथीदार प्रशांत रघुनाथ चौधरी (रा. रामेश्वर कॉलनी अमळनेर) हा सध्या नाशिक कारागृहात आहे.
अटकेतील तिघांनी दिलेल्या माहितीनुसार अमळनेर पोलिस स्टेशनला दाखल असलेले चोरीचे तिन गुन्हे उघडकीस आले आहेत. मनिष महाजन याने दिलेल्या माहितीच्या आधारे आडगाव नाशिक येथील एक मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. ती चोरीची मोटार सायकल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील हे.कॉ. संदिप पाटील, कमलाकर बागुल, प्रविण मांडोळे, गोरख बागुल, राहुल बैसाणे, अशोक पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.