यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील चितोडा येथील तरुणाच्या खूनप्रकरणात यावल पोलिसांनी अटक केलेल्या चौथ्या संशयितास गुरुवारी पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. त्याच्यासह आधी अटकेत असलेल्या महिलेसह तिघांना २९ ऑगस्ट रोजी न्यायालयात पुन्हा हजर केले जाणार आहे.
उसनवारीचे ४ लाख रूपये मागितल्याच्या कारणावरून चितोडा येथील मनोज संतोष भंगाळे (वय ३८) या तरुणाची २१ ऑगस्टच्या रात्री निर्घृण हत्या करण्यात आली होती. या खुनाच्या गुन्ह्यात पसार असलेला जितेंद्र भगवान कोळी उर्फ आतंक (रा.अट्रावल) याला यावल पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्यास गुरुवारी यावल न्यायालयात प्रथमवर्ग न्यायाधीश एम.एस.बनचरे यांच्यासमोर हजर केले. तेथे त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.
यापूर्वी पोलिसांनी या गुन्ह्यात कल्पना शशिकांत पाटील (रा.चितोडा), देवानंद बाळू कोळी (मूळ रा.यावल, ह.मु. चितोडा) व मितेश उर्फ विघ्नेश भरतसिंग बारेला (रा.निमगाव) या तिघांना अटक केली आहे. ते देखील २९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत आहेत. त्यामुळे सर्व चौघांना २९ ऑगस्टला न्यायलयात हजर करण्यात येईल. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर, उपनिरिक्षक विनोद खांडबहाले, सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण, हवालदार जगन्नाथ पाटील, भूषण चव्हाण करत आहे. दरम्यान, पोलिसांनी गुन्ह्यातील चौथा संशयित जितेंद्र भगवान कोळी उर्फ आतंक याला गुरुवारी न्यायालयात नेण्याआधी आरोग्य तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे त्याची साडेचार वर्षांची मुलगी त्यास बिलगून ढसाढसा रडत होती.