पॅरिस (वृत्तसंस्था) संपूर्ण जगावर ओढावलेले कोरोना महामारीचे संकट कायम असून जगभरातील काही देशांमधील परिस्थिती अद्यापही चिंताजनक आहे. या परिस्थितीतून मात्र काही देश लॉकडाउनमध्ये अडकले आहेत. फ्रान्समध्ये सध्या अशीच परिस्थिती आहे. फ्रान्समध्ये तिसऱ्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी नुकतीच ही घोषणा केली.
इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी बुधवारी फ्रान्समध्ये तिसऱ्या लॉकडाउनची घोषणा करताना शाळा तीन आठवड्यांसाठी बंद असतील अशी माहिती दिली आहे. देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे रुग्णालयांवर प्रचंड ताण येण्याची शक्यता व्यक्त करत इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी लाटेला परतवून लावण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी अर्थव्यवस्था पुन्हा एकदा सुरळीत करण्यासाठी देशातील निर्बंध मागे घेण्याची तयारी केली होती. मात्र एक लाख मृत्यू झाले असून आयसीयूंची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आणि योजनेपेक्षा कमी वेगाने सुरु असलेलं लसीकरण यामुळे इमॅन्युअल मॅक्रॉन यांना माघार घ्यावी लागली आहे.
“जर आपण आता हालचाल केली नाही तर नियंत्रण गमावू,” अशी भीती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी देशवासियांना संबोधित करताना व्यक्त केली. फ्रान्समध्ये महिन्याभरासाठी लॉकडाउन लागू करण्यात आला असून शनिवारपासून अमलबजावणी होणार आहे. महामारीचा शिक्षणाला फटका न बसू देण्याची ग्वाही देणाऱ्या इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी शाळादेखील तीन आठवड्यांसाठी बंद असतील असं स्पष्ट केलं आहे.















