जळगाव (प्रतिनिधी) फ्लॅट देण्याचे सांगून पाळधी ता. धरणगाव येथील दाम्पत्याने शहरातील मुक्ताईनगरात राहणारे दिनेश तिवारी यांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दाम्पत्यांवर गुन्हा करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, दिनेश रामचंद तिवारी (वय-४९) रा. वासुकमल नंदनवन अपार्टमेंट, मुक्ताईनगर जळगाव हे कुटुंबियांसह राहतात. शेती काम करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची ब्रोकर इस्टेट एजंट बिरज इंदरचंद जैन यांच्यामार्फत हरीष रामचंद्र झवर व पुजा हरीष झवर (दोन्ही रा. पाळधी बु ता. धरणगाव) यांचे मालकीचा जळगावातील मुक्ताईनगरातील वासुकमल अपार्टमेंट येथे फ्लॅट विक्रीला असल्याचे सांगितले. दिनेश तिवारी यांनी तो फ्लॅट पाहिला व आवडला. सदरील फ्लॅटवर कोणताही बोजा नसल्याचे झवर यांनी सांगितले. तिवारी यांनी ११ हजार रूपयांचे टोकनही दिले.
दरम्यान तिवारी यांनी मालमत्ता घेतांना कोणाचाही आक्षेप होवू नये म्हणून ३० सप्टेंबर २०११ रोजी वर्तमानपत्रात नोटीस देण्यात आली. ७ ऑक्टोबर २०१९ रोजी फ्लॅट खरेदी संदर्भात झवर यांना सांगितले असता सौदापावती न करता तोंडी घराचा ताबा देवून खरेदी नंतर करतो असे सांगितले. तिवारी यांनी विश्वास ठेवून झवर यांच्या मागणीप्रमाणे एकुण ४१ लाख १९ हजार रूपये दिले. दरम्यान तिवारी यांचा मे २०२० मध्ये अपघात झाला होता त्यामुळे ते घरीच होते. तिवारी यांनी झवर यांच्याकडे फ्लॅट खरेदी करण्याचा तगादा लावला त्यानी कागदपत्रे दिली. तर त्यात स्टेट बँकेचा बोजा असल्याचे दिसून आले. फ्लॅट खरेदीसाठी बोजा क्लियर करून द्यावा असे सांगितले असता हरीष झवर यांनी ८ सप्टेंबर २०२० तिवारी यांना नोटीस पाठविली. त्यात ६७ लाख ५१ हजार रूपये एवढी ठरलेली असून आपण फक्त ५ लाख ३८ हजार रूपये दिल्याचे नमूद केलेले होते.
यावरून आपली फसवणूक झाल्याचे तिवारी यांच्या लक्षात येताच त्यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. दिनेश तिवारी यांच्या फिर्यादीवरून काल शनिवार २४ जुलै रोजी हरीष झंवर आणि पुजा हरीष झवर यांच्या विरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात फसवूणकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक शरीफ शेख करीत आहे.