अमळनेर (प्रतिनिधी) भारत फायनान्शियल लिमिटेड बँक या खाजगी बँक कर्मचाऱ्यांनी बँकेच्या 144 सदस्यांकडून हप्ता वसुली करून एकूण 11 लाख 13 हजार 510 रुपयांचा अपहार करत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनिवारी 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर शहरात भारत फायनान्शिअल लिमिटेड बँक असून या बँकेत उमाकांत आधार विसावे रा. झुरखेडा आणि मयूर मिठाराम बडगुजर (रा. सुंदरगढी, चोपडा) हे दोन जण कर्मचारी म्हणून कामाला आहे. 11 ऑगस्ट 2023 ते 5 एप्रिल 2024 च्या दरम्यान या दोघांनी बँकेचे 144 सदस्यांकडून एकूण 11 लाख 13 हजार 510 रुपयांची हप्ता वसुली करून ती रक्कम कंपनीत जमा न करता फसवणूक केली आहे. दरम्यान ही बाब लक्षात आल्यानंतर खाजगी बँकेचे मॅनेजर अमोल सुरेश मराठे यांनी शनिवारी 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता अमळनेर पोलिसांना तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी उमाकांत आधार विसावे (रा. झुरखेडा ता. धरणगाव) आणि मयूर मिठाराम बडगुजर रा. सुंदरगढी, चोपडा या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ हे करीत आहे.