सोलापूर (प्रतिनिधी) शेअर मार्केटद्वारे मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तसेच सुरुवातीला काही दिवस नफा मिळवून देत एका निवृत्त ज्येष्ठ नागरिकाला २ कोटी २८ लाख ११ हजार रुपयांना फसविल्याप्रकरणी शहर पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्यात व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनसह अनेक ठगांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
सोलापूर शहर सायबर पोलीस ठाणे येथे आरोपी टुलनाहिना मायटी या व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनसह इतर मोबाइल धारकांवर भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१९ (२), ३ (५), आय. टी. अॅक्ट ६६ (सी), ६६ (डी) प्रमाणे दि. २४ ऑक्टोबर रोजी दुपारी १.५१ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अनिल गोविंद श्रीगोंदेकर (वय ६८, रा. बालाजी हौसिंग सोसयटीजवळ, होटगी रोड, सोलापूर) यांना दि. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी पासूत ते आजतगायत ऑनलाइन स्वरूपात आरोपींनी त्यांची फसवणूक केली.
फिर्यादी घरी असताना आरोपींनी टूलनाहिना मायटी या व्हॉट्सअॅप नावाने व एसबीआय सिक्युरिटी अॅप्लिकेशन या नावाच्या मोबाइलधारक व एसबीआय सिक्युरिटी ग्रुप या नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनने फिर्यादीच्या आयसीआयसीआय बँक खात्यावर ४ लाख २४ हजार ५०० रुपये अदा करणारे रिमाइटर बँक अकाउंट होल्डर याचा वापर व धारककर्ते यावरून त्यांनी सादर केलेले बेनीफेशिअरी बँक अकाऊंट होल्डर याचा वापर करून तसेच या प्रकारात षड्यंत्र करणारे इतर सर्व सदस्य मिळून शेअर मार्केटद्वारे नफा मिळत असल्याचे भासविले. सुरुवातीस काही प्रमाणात नफा देऊन फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर झालेला नफा फिर्यादी विड्रॉलचा प्रयत्न केला तेव्हा या ना त्या कारणाने पैसे देण्याचे टाळाटाळ करून फिर्यादीची एकूण २ कोटी २८ लाख ११ हजार रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार निदर्शनास येतात त्यांनी शहर पोलीस आयुक्तालय गाठून तेथील सायबर क्राइम पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून याचा तपास सुरू केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक गजा हे करीत आहेत.
















