नाशिक (प्रतिनिधी) रेल्वेत नोकरी लावून देतो, असे सांगून बनावट शिक्के व नियुक्तिपत्रे देऊन तीन वेगवेगळ्या घटनांत जवळपास ५० लाखांची फसवणूक झाल्याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या घटनेत संतोष चंद्रकांत कटारे (वय ५०, रा. देवळाल कॅम्प) व संतोष शिवा गायकवाड (वय ४५) या दोन संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित संतोष कटारे आणि संतोष गायकवाड व अमोल ठाकूर यांनी महेंद्र गोरख सोनवणे (वय २४, रा. बी १ रो हाउस केरू पाटील नगर, महावितरण सबस्टेशनजवळ, जेलरोड, नाशिकरोड) नावाचा युवक, त्याची बहीण संगीता यांना रेल्वेत ‘ग्रुप सी’मध्ये व महेंद्रचा मामा चेतन भास्कर सोनवणे यांना ‘ग्रुप डी’मध्ये नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली. संशयितांनी भारत सरकारची राजमुद्रा असलेली छापील मोहोर व रेल्वेचा सिम्बॉल असलेला मिनिस्ट्री ऑफ रेल्वे न्यू दिल्ली (११०००१) असा रबरी स्टॅम्प व असिस्टंट पर्सोनल ऑफिसरची सही असलेले ऑफर लेटर तयार करून या तिघांची एकूण १९ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली.














