मेहूणबारे (प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्यातील देवळी येथील बँक ऑफ बडोदामध्ये बचत गटसह इतर ग्राहकांनी भरणा करण्यासाठी दिलेल्या पैशांचा अपहार केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी निलेश शिवराज शिंदे (रा. बिलखेडा, ता.चाळीसगाव) याने बँकेची पावती तयार करून ग्राहकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
या संदर्भात अधिक असे की, आरोपी निलेश शिवराज शिंदे हा देवळी येथील बँक ऑफ बडोदामध्ये बँक मित्र म्हणून काम करत होता. निलेश शिंदे याने जानेवारी २०२० ते ३१ जानेवारी २०२१ च्या दरम्यान, देवळी गावातील बचत गटसह इतर ग्राहकांनी बँकेत भरणा करण्यसाठी वेळोवेळी दिलेले तब्बल ६२ लाख ६१ हजार ८९९ रुपयांचा अपहार केला. निलेश शिंदे याने देवळी येथील बँक ऑफ बडोदाचा स्टॅम्पचा वापर करुन बँकेत पैसे भरल्याची खोटी पावती ग्राहकांना देवून ६२ लाख ६९ हजार ८९९ रुपयांची परस्पर स्वतःच्या फायद्यासाठी अपहार करुन लोकांची विश्वासघात केला. या प्रकरणी सुदर्शन साहेबराव पाटील (रा.देवळी) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि योगेश ढिकले हे करीत आहेत.
















