जळगाव (प्रतिनिधी) काजल ट्रेडींग कंपनी नफा मिळवून देईल. तसेच कंपनीसोबत ऑनलाईन ट्रेडींग सुरु करण्याच्या नावाखाली एका व्यापाऱ्याची ५ लाख ७६ हजार १५१ रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात ट्रेडर काजल इंस्टाग्राम खातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, मार्च २०२१ ते आजपावेतो वेळोवेळी सचिन अशोककुमार मंदान (वय २५ रा. A ३०६ एक्सोटिका अपार्टमेंट, मोहाडी रोड, जळगाव) यांना Instagram या सोशल मिडीया साईटवर trader_kajal (financial advisors and traders) Instagram खाते खातेधारकाकडुन ट्रेडींग साठी मेसेज आला असतांना समोरील अज्ञात व्यक्तीने सचिन मंदान यांना काजल ट्रेडींग कंपनी ही तुम्हाला ट्रेडींग मध्ये चांगला नफा मिळवून देईल. सदर कंपनीसोबत ऑनलाईन ट्रेडींग सुरु करण्यासाठी वारंवार तगादा लावुन त्यानुसार सचिन मंदान यांचेकडुन डिमॅट खात्याचा युझर आयडी व पासवर्ड घेवून शेअर मार्केट मध्ये ट्रेडींग करतांना ऑनलाईन KAJAL JAIN या नावाच्या इंडियन बँक खात्यावर रक्कम भरण्यास लावुन वेळोवेळी ट्रेडींगचे नावाखाली एकुण रक्कम ५,७६,१५१ रुपये स्विकारुन सचिन मंदान यांना कोणताही आर्थिक फायदा न करता त्यांची आर्थिक फसवणुक केली. याप्रकरणी सचिन अशोककुमार मंदान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात ट्रेडर काजल इंस्टाग्राम खातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहेत.