जळगाव (प्रतिनिधी) उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत एलपीजी गॅस कनेक्शन देण्याच्या नावाखाली १२०० महिलांकडून प्रत्येकी १५० रुपये असे एकूण एक लाख ८० हजार रुपये घेणाऱ्यांचा पर्दाफाश झाला आहे. फसवणूक करणाऱ्या दोघांना शनिपेठ पोलिसांनी अटक असून याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
नेमका काय आहे प्रकरण !
शहरातील जूना असोदा रोड परिसरात भारत गॅस एजन्सीचा एजंट परिसरात स्टॉल व बॅनर लावून महिलांना उज्वला गॅस योजनेचा लाभ देण्यासाठी त्यांच्याकडून दीडशे रुपये गोळा करीत होता. त्या तरुणाची चौकशी केली असता, त्याने विजय गंगाधर भोलाणे व करण विजय भोलाणे (दोघ रा. बी. जे. मार्केट) असे त्यांचे नाव सांगितले. त्यांनी कल्पशे ज्ञानेश्वर इंगळे (रा. मूळ रा. आव्हाणी ता. धरणगाव ह.मु. रामेश्र्वर कॉलनी) व राहुल गणेश सपकाळे (रा. सुप्रिम कॉलनी) यांच्या सांगण्यावरुन दि. २८ सप्टेंबर पासून शहरातील विविध भागात स्टॉल लावून पैसे गोळा करीत आहे.
आतापर्यंत सुमारे १२०० महिलांकडून घेतले पैसे !
आतापर्यंत त्यांनी शहरातील हरिविठ्ठल नगर, आशाबाबा नगर, खंडेराव नगर, अयोध्या नगर, गोपाळपुरा, असोदा रोड परिसरात स्टॉल लावले. याठिकाणाहून आतापर्यंत सुमारे १२०० महिलांकडून आधार कार्ड, रेशनकार्ड यांच्या झेरॉक्स व फोटो आणि पैसे घेतले असल्याची सांगितले.
दोघांच्या सांगण्यावरुन लावत होते स्टॉल !
दोन्ही बाप लेक कल्पेश इंगळे व राहुल सपकाळे यांच्या सांगत असलेल्या ठिकाणी स्टॉल लावायचे. तसेच सायंकाळी नोंदणी झालेली नावे आणि हिशोब ते घेत असत. माहिती अधिकार कार्यकर्ते शैलेस सपकाळे यांनी गॅस एजन्सीच्या मॅनेजरकडे चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आणला. याप्रकरणी विजय गंगाधर भोलाणे (वय ६७), करण विजय भोलाणे, कल्पेश ज्ञानेश्र्वर इंगळे व राहुल गणेश सपकाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत धनके हे करीत आहे.