जालना (वृत्तसंस्था) राज्यातील काही जिह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असून त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. या आजाराच्या जनजागृतीसाठी मोहीम हाती घेण्यात येणार असून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी जालना येथे माध्यम प्रतिनिधींनीशी बोलताना दिली.
कोरोनातून उपचार घेऊन बरे झालेल्या अनेक रुग्णांना म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराची लागण झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत. या आजारामध्ये नाकाजवळ, ओठांच्या आजुबाजुला काठे ठिपके दिसतात. त्यावर वेळीच उपचार झाले नाही तरनाक किंवा श्वसनयंत्रणे मार्फक बुरशी शरिरात प्रवेश करते आणि नंतर ती डोळे, मेंदू यावर प्रामुख्यानं हल्ला करते असं टोपे यांनी सांगितलं आहे. लक्षणं दिसल्या दिसल्या लगेच निदान आणि उपचार करणं यावर सर्वात गरजेचं असल्याचंही टोपे म्हणाले. त्यामुळं लोकांना याची माहिती व्हावी म्हणून मोठ्या प्रमाणामावर जनजागृती करणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं. तर यावरील उपचार करण्यासाठी औषधी अत्यंत महागडी आहेत. त्यामुळं महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत या आजाराचा समावेश करण्याची महत्त्वाची घोषणा टोपेंनी केली. त्यामुळं राज्यात १००० रुगणालयात यावर मोफत उपचार होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
म्युकरमायकोसिस दुर्मिळ असला, तरी नवा नाही. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या, अतिदक्षता विभागात असलेल्या, तसंच अवयव प्रत्यारोपण केल्या जाणाऱ्या रुग्णांमध्ये ब्लॅक फंगस म्हणजेच म्युकरमायकोसिस होणं तसंच त्यामुळे त्यांचा मृत्यू होणं अशा गोष्टी पूर्वीपासूनच घडत आहेत. पण कोविड-१९ मुळे त्याची लागण होत असल्याची गोष्ट नवी आणि धोकादायक आहे, असं डॉक्टर्सचं म्हणणं आहे.
या आजारामुळे कोरोना रुग्णांनी घाबरून न जाता मधुमेह असणाऱ्यांनी तो नियंत्रित ठेवावा. त्यासाठी व्यायाम, योग्य आहार आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करून घेण्याचे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.