मुंबई (वृत्तसंस्था) लॉकडाउनच्या काळात आलेल्या भरमसाठ वीज बिलात सवलत देण्यास ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी नकार दिल्यामुळे विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. या वादात आता मनसेनंही आक्रमक भूमिका घेतली आहे. “लातों के भूत बातों से नहीं मानते” म्हणत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकारविरोधात आक्रमकपणे हल्ला चढवला आहे.
आता वीज बिलात सवलत देण्यासाठी देशपांडे यांनी ट्वीट करून ठाकरे सरकारला थेट इशाराच दिला आहे. ‘वीज बिला संदर्भात निवेदन, अर्ज, बैठका, विनवण्या सगळं झालं. पण सरकार ढिम्म आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल कारण “लाथो के भूत बातों से नही मानते” असं म्हणत देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. दरम्यान, आज वाढीव वीज बिलासंदर्भात मनसेनं आज बैठक बोलावली आहे. मुंबईतील पक्ष कार्यालयात दुपारी २ वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत वीज बिलासंदर्भात आंदोलनाची रणनीती आखली जाणार आहे.
दरम्यान, कोरोनाने डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेमुळे सगळंच गणित कोलमडलं असून सवलत देता येणार नाही, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले.
राज्यातील वाढीव वीज बिलांबाबत ठाकरे सरकारने कोणताही दिलासा नाही, इतकंच नाही तर वीज वापरली असेल तर बिल भरावे लागेल, कुठलीही मापे आणि सवलत देणार नाही असे स्पष्टपणे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जनतेला सांगितले, त्यामुळे लॉकडाउन काळात आर्थिक संकटात असणारा वीज ग्राहकांना मोठा झटका बसला. मात्र सरकारच्या या निर्णयावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.